टंचाईग्रस्त गावांत तातडीने उपाययोजना करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2016 11:56 PM2016-04-05T23:56:53+5:302016-04-06T00:12:48+5:30
संध्यादेवी कुपेकर : गडहिंग्लज येथील पाणीटंचाई बैठकीत सूचना
गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील टंचाईग्रस्त खेड्याला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, अशी सूचना आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना मंगळवारी केली.
आमदार कुपेकरांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील पाणी टंचाई आढावा बैठक येथील पंचायत समिती सभागृहात झाली. यावेळी त्यांनी टंचाईग्रस्त गावांतील उपाययोजना संदर्भात संबंधित अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. सभापती मीनाताई पाटील, उपसभापती तानाजी कांबळे, डॉ. नंदिनी बाभूळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
टंचाईग्रस्त गावांची घोषणा दोन आठवड्यांपूर्वी होऊनदेखील शासन पातळीवर अद्याप उपाययोजना न झाल्याबद्दल आणि बैठकीस महसूल खात्याचे अधिकारी उपस्थित न राहिल्याबद्दल पं. स.चे सदस्य अमर चव्हाण यांनी प्रारंभीच तीव्र नाराजी व्यक्त केली.
येणेचवंडी, नंदनवाड, मनवाड व कुंबळहाळ या गावांसाठी हिरण्यकेशीतून पाणी देण्याची मागणी दीपक पुजारी यांनी केली. या गावांसाठी खणदाळवरून येणेचवंडीतून एखाद्या खासगी विहिरीत पाणी टाकून ते पाणी संबंधित गावांना देता येईल, अशी उपाययोजना चव्हाण यांनी सुचवली. त्यासंदर्भात तातडीने पाहणी करण्याची सूचना देण्यात आली.
चिंचेवाडी व नौकुड या गावांना पाणी देण्यासाठी सामानगडावरील सातकमानीच्या विहिरीतील गाळ काढण्याची व्यवस्था करावी. त्यासाठी आमदार फंडातून पाच लाखांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी सूचनाही चव्हाण यांनी केली. बाळेश नाईक यांनीही त्यास दुजोरा दिला.
चंदनकूड येथे गावापेक्षाही अधिक लोक वाड्या-वस्त्यांवर राहतात. त्यांना गावातील बोअरचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना स्थानिक ग्रामस्थांनी केली.
जि. प.चे सदस्य जयकुमार मुन्नोळी, जयसिंग चव्हाण, सदानंद पाटील यांनीही चर्चेत भाग घेतला. गटविकास अधिकारी शाम वाखार्डे यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली. यावेळी सहायक गटविकास अधिकरी प्रदीप जगदाळे यांच्यासह उपसा जलसिंचन, जिल्हा परिषद बांधकाम, लघुजलसिंचन, महावितरण, आदी खात्यांचे अधिकारी, सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दिरंगाई झालेली नाही
चंदगड व गडहिंग्लज तालुक्यांतील टंचाईग्रस्त गावांचा वस्तुनिष्ठ आराखडा तयार केला आहे. गडहिंग्लज तालुक्यातील १४ व चंदगड तालुक्यातील १६ मिळून एकूण ३० गावे टंचाईग्रस्त आणि त्यासंबंधीची उपाययोजना जाहीर केली आहे. जूनअखेरची संभाव्य पाणीटंचाई विचारात घेऊन प्रशासनाने सर्वप्रकारची कार्यवाही वेळेवर पूर्ण केली आहे.
- डॉ. कुणाल खेमणार, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी, गडहिंग्लज.
प्रशासनाने फिरविली बैठकीकडे पाठ !
विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाही वेळ काढून आमदार कुपेकर या बैठकीस उपस्थित राहिल्या. मात्र, प्रांताधिकारी व तहसीलदार बैठकीला उपस्थित नाहीत, ही दुर्दैवी बाब असून प्रशासनाचा पोरखेळ सुरू आहे, असा आरोप अमर चव्हाण यांनी केला. टंचाईप्रश्नी अधिकारी गंभीर नसतील तर लोक मोर्चे काढतील, असा इशारा डॉ. बाभूळकरांनी यावेळी दिला.