कृषीपंपाना तत्काळ जोडणीचे आदेश
By admin | Published: May 26, 2015 12:22 AM2015-05-26T00:22:58+5:302015-05-26T00:48:41+5:30
चंद्रकांतदादा पाटील : विद्युत वितरण नियंत्रण समितीची पहिली बैठक संपन्न
कोल्हापूर : कृषी पंपांच्या जोडणीतील दिरंगाई निकालात काढण्यासाठी (झिरो पेंडन्सीसाठी) आवश्यक बाबी प्राधान्याने करून वर्षभरात जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना वीज पंपांची जोडणी द्यावी, असे आदेश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी महावितरण व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय विद्युत वितरण नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ग्राहक व वीजवितरण कंपनी यांच्यात संवाद व समन्वय नसल्यास अडचणीच्या प्रसंगी ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण होऊ नये तसेच महावितरण कंपनीचा कारभार पारदर्शक व प्रभावीपणे चालविण्यासाठी व ग्राहकांना उत्तम व दर्जेदार सेवा पुरवण्यासाठी जिल्हास्तरावर व तालुका स्तरावर विद्युत वितरण नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची पहिली बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार सत्यजित पाटील, उल्हास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, आयुक्त पी. शिवशंकर, ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता डी. ए. कुमठेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन आटोळे, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी सुरेश मगदूम यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री पाटील यांनी जिल्ह्यातील विद्युत वितरणासंदर्भातील सद्य:स्थिती तसेच, समितीच्या सदस्यांच्या सूचना जाणून घेतल्या. कोल्हापूरमधील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौरऊर्जा वापरण्यात येईल का, याबाबत विचार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
सत्यजित पाटील म्हणाले, संपूर्ण जिल्ह्यात मार्च २०१२ पासून वीज पंपांची जोडणी प्रलंबित आहे. आतापर्यंत ७४५१ वीज जोडण्या प्रलंबित असून, त्यापैकी ५४७० वीज जोडण्या इन्फ्रा २ प्रकल्पांतर्गत करण्यात येत आहेत. याबाबत अधिक माहिती देताना ‘महावितरण’च्या कोल्हापूर परिमंडल कार्यालयाचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी या कामाची गती कमी आहे. त्यामुळे तालुकानिहाय शेती पंपांच्या निविदा काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
काही ग्राहक प्रतिनिधींनी विजेचे गंजलेले खांब व पथदिवे दुरुस्तीची मागणी केली. त्यावर अधीक्षक अभियंता दीपक कुमठेकर यांनी ही बाब ‘अपग्रेडेशन अँड मॉडर्नायझेशन’ तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून होत आहेत. जादा निधी मिळाल्यानंतर संपूर्ण कामे करण्यात येतील, असे सांगितले. यावेळी आमदार उल्हास पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, संभाजी पाटील, नाथाजी पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)