Kolhapur: अंबाबाई मूर्ती संवर्धनासाठी तातडीने पावले उचलू - जिल्हाधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 12:29 PM2024-03-16T12:29:37+5:302024-03-16T12:30:12+5:30
पुजाऱ्यांना सूचना, दर १५ दिवसांनी बैठक
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्ती संवर्धनासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने राज्य पुरातत्व विभागाकडून मूर्तीची पाहणी करून घेतली होती. त्याचा अहवाल समितीला सादर झाला आहे. यासह दोन दिवस न्यायालयीन आदेशाने मूर्तीची पाहणी झाली आहे. समितीला आलेला अहवाल व तज्ज्ञांच्या अहवालातील सूचनांनुसार मूर्तीचे तातडीने संवर्धन केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शुक्रवारी दिली.
अंबाबाई मूर्तीची शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पुरातत्व विभागाचे निवृत्त अधिकारी आर. एस. त्र्यंबके व विलास मांगिराज यांनी मूर्तीची पाहणी केली. यावेळी स्वत: जिल्हाधिकारी अमोल येडगे, पुरातत्व विभागाचे सहसंचालक विलास वाहने यांच्यासह ॲड. प्रसन्न मालेकर, दिलीप देसाई यांच्यासह वादी-प्रतिवादी उपस्थित होते. तज्ज्ञांचा अहवाल २५ तारखेला न्यायालयाला सादर होणार आहे. यावर ४ एप्रिल रोजी सुनावणी होईल.
याबाबत जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, देवस्थान समितीने काही महिन्यांपूर्वी अंबाबाई मूर्तीची राज्य पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करून घेतली होती. त्यांचा अहवाल समितीला मिळाला आहे. त्या अहवालानुसार मूर्तीचे जतन संवर्धन करण्यात येईल. दरम्यान, न्यायालयीन प्रक्रियेद्वारेदेखील गेले दोन दिवस मूर्तीची पाहणी झाली आहे. त्यांचा अहवाल न्यायालयात सादर होईल. या दोन्ही अहवालातील निष्कर्षानुसार अंबाबाई मूर्तीचे जतन संवर्धन केले जाईल.
पुजाऱ्यांना सूचना, दर १५ दिवसांनी बैठक
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, शुक्रवारी केंद्रीय पुरातत्व खात्याचे अधिकारी कोल्हापुरात आले होते. त्यांच्याशीदेखील मूर्तीबाबत चर्चा झाली असून, त्यांनी संवर्धनाबाबत सकारात्मकता दाखवली आहे. मूर्तीची काळजी घेण्यासाठी पूजाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. दर १५ दिवसांनी बैठक घेऊन मूर्तीबाबत आढावा घेतला जाईल.