तात्काळ तिकिटांची आजपासून दरवाढ
By admin | Published: December 24, 2015 11:35 PM2015-12-24T23:35:49+5:302015-12-24T23:46:30+5:30
प्रवास महागला : प्रवाशांना फटका
मिरज : तात्काळ तिकिटांच्या दरात दि. २५ पासून १० ते ३० टक्के दरवाढ होणार असल्याने रेल्वे प्रवाशांसाठी तात्काळ तिकिटावर प्रवास महागडा होणार आहे. त्यातच स्लिपर श्रेणीसह वातानुकूलित दर्जाच्या प्रवासासाठी तात्काळ तिकिटाला आता दोनशे ते पाचशेपर्यंत दरवाढ होणार आहे. यामुळे तात्काळ तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.
रेल्वेगाड्या नेहमीच फुल्ल असल्याने ऐनवेळी आरक्षण उपलब्ध होणाऱ्या तात्काळ आरक्षित तिकिटांना मोठी मागणी आहे. ओळखपत्राची सक्ती, तात्काळ तिकीट विक्रीसाठी स्वतंत्र वेळ, अशा उपाययोजना रेल्वे प्रशासनाने केल्या आहेत. तात्काळ आरक्षित तिकीट मिळविण्यासाठी रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रातील तिकीट खिडक्यांवर रांगा लागतात. विक्री सुरु झाल्यानंतर रेल्वे तिकीट खिडकीवर किमान अर्धा तास मिळणारी तात्काळ तिकिटे केवळ पाचच मिनिटात संपतात. यामुळे सामान्य प्रवाशांना तात्काळ तिकीट मिळणे दुरापास्त असल्याने, अनधिकृत तिकीट एजंटांकडून जादा दराने काळ्या बाजारात तात्काळ तिकीट घ्यावे लागते. आता रेल्वे प्रशासनाने तात्काळ तिकिटाच्या दरात आणखी वाढ करून तात्काळ तिकिटावरील प्रवास महाग केला आहे. प्रवाशांना तात्काळ रेल्वे तिकिटासाठी शुक्रवारपासून दहा ते तीस टक्के जादा पैसे मोजावे लागणार आहेत. तात्काळ रेल्वे तिकिटासाठी पाचशे किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासासाठी स्लिपर श्रेणीसाठी जास्तीत जास्त २०० व प्रथम, द्वितीय व तृतीय श्रेणी वातानुकूलित बोगीसाठी ४०० ते ५०० रूपये तिकीट दर वाढणार आहे. द्वितीय श्रेणी आरक्षित बोगीसाठी दरवाढ कमी असल्याने जवळच्या प्रवासासाठी २५ ते ५० रूपये दरवाढ होणार असली तरी, वातानुकूलित बोगीच्या तात्काळ तिकिटासाठी किमान १०० ते २०० रूपये जादा द्यावे लागणार आहेत. तात्काळ आरक्षित तिकिटे अनधिकृत एजंटांकडून जादा दराने घ्यावी लागतात. त्यातच आता रेल्वेने दरवाढ केल्याने तात्काळ तिकिटावर प्रवास करणे सर्वसाधारण प्रवाशांसाठी अवघड होणार आहे. (वार्ताहर)
साधारण आरक्षित तिकिटापेक्षा तात्काळ आरक्षित तिकिटासाठी स्लिपर श्रेणीसाठी १०० व एसीसाठी ३०० रूपये जादा आकारणी करण्यात येते. मिरज ते मुंबई द्वितीय श्रेणीतून प्रवासासाठी तात्काळ तिकीट दर ३७५ ऐवजी ३९५ रूपये होणार आहे. मिरज ते मुंबई एसीतून प्रवासासाठी १३०० ऐवजी आता १५०० रूपये द्यावे लागणार आहेत.
नवीन कमाल दरवाढ
द्वतीय श्रेणी - २०० रूपये
बैठक आरक्षण - १५
एसी चेअर कार - ४००
एसी प्रथम व द्वितीय श्रेणी- ५००
एसी तृतीय श्रेणी - ४००