सुटकेचा निःश्वास... तूर्त महापुराचे संकट टळले, पंचगंगेचे पाणी ओसरू लागले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 07:36 PM2020-08-08T19:36:35+5:302020-08-08T20:33:04+5:30
धरणक्षेत्रासह शहरामध्ये पावसाचा जोर कमी झाला असून, पंचगंगा नदीच्या पुराचे पाणीही ओसरत आहे. यामुळे सध्या तरी महापुराचे संकट टळले आहे. पूरक्षेत्रासह शहरातील नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला असून, त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
कोल्हापूर : धरणक्षेत्रासह शहरामध्ये पावसाचा जोर कमी झाला असून, पंचगंगा नदीच्या पुराचे पाणीही ओसरत आहे. यामुळे सध्या तरी महापुराचे संकट टळले आहे. पूरक्षेत्रासह शहरातील नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला असून, त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार सुरुवात झाली. यामध्ये राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले. पंचगंगा नदीने धोकापातळी ओलांडल्याने शहरातील अनेक ठिकाणी पुराचे पाणी शिरले.
यंदाही महापूर येणार अशीच स्थिती होती. सुदैवाने गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रांसह शहरातही पावसाचा जोर कमी झाला. यामुळे पंचगंगा नदीची पाण्याची पातळी कमी होत आहे. परिणामी शहरातील पूर ओसरू लागला आहे. शाहूपुरी, कुंभार गल्ली आणि सुतारवाडा येथील पाणी उतरत आहे.
पंचगंगा तालीम येथीलही पाणी उतरले
पंचगंगा नदीपात्रातून पाणी बाहेर पडल्यामुळे गंगावेश ते शिवाजी पूल हा मार्ग बंद आहे. शुक्रवारी (दि. ७) सायंकाळी पंचगंगा तालमीपर्यंत पुराचे पाणी आले होते. शनिवारी सकाळपासूनच पाण्याची पातळी कमी होत गेली. सायंकाळी पंचगंगा तालीम येथील पाणी उतरत असून आखरी रस्ता गल्ली येथेपर्यत आले. जामदार क्लब, गायकवाड पुतळा परिसरात अद्यापही पुराचे पाणी आहे.
दुसऱ्या दिवशीच व्हीनस कॉर्नर येथील पाणी उतरले
मागील वर्षी दसरा चौकातील टायटन शोरूमपर्यंत महापुराचे पाणी आले होते. येथे आठ दिवस पाणी होते. नागरिकांना स्थलांतरित केले होते. शुक्रवारी व्हीनस कॉर्नर ते स्टेट बँक रस्त्यावर पाणी आल्यामुळे तो बंद झाला होता. येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. शनिवारी दुपारनंतर हा रस्ताही खुला झाला.
खोल खंडोबा मंदिरात पाणी
शनिवार पेठेमध्ये खोल खंडोबा मंदिर आहे. सर्वांत जुने म्हणजे ४०० वर्षांपूर्वीचे हे मंदिर आहे. तिथे शनिवारी पाणी आले. पंचगंगा नदीला पूर आल्यानंतर मच्छिंद्री झाली तरच या ठिकाणी अशा प्रकारे पाणी येते. भक्तजण मोठ्या संख्येने पाणी पाहण्यासाठी येथे येत आहेत.