धार्मिक वातावरणात पंजे विसर्जन, प्रमुख मार्गांवरून मिरवणूक : दर्शनासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 11:00 AM2019-09-11T11:00:36+5:302019-09-11T11:02:50+5:30

पावसानेही उसंत घेतल्याने पंजांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर भाविकांनी गर्दी केली होती. पंजांचे विसर्जन आणि गणेशदर्शन-देखावे पाहण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी कोल्हापुरातील रस्ते फुलून गेले होते.

Immerse the claws in a religious environment | धार्मिक वातावरणात पंजे विसर्जन, प्रमुख मार्गांवरून मिरवणूक : दर्शनासाठी गर्दी

धार्मिक वातावरणात पंजे विसर्जन, प्रमुख मार्गांवरून मिरवणूक : दर्शनासाठी गर्दी

Next
ठळक मुद्देधार्मिक वातावरणात पंजे विसर्जनशहरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक : दर्शनासाठी गर्दी

कोल्हापूर : पारंपरिक वाद्यांचा गजर, अबिराची उधळण, धुपाचा दरवळ आणि ‘अलविदा हो, अलविदा’ म्हणत मंगळवारी पंजांचे पंचगंगा नदीत विसर्जन करण्यात आले. पावसानेही उसंत घेतल्याने पंजांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर भाविकांनी गर्दी केली होती. पंजांचे विसर्जन आणि गणेशदर्शन-देखावे पाहण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी कोल्हापुरातील रस्ते फुलून गेले होते.

मोहरम या सणाला हिंदू-मुस्लिम ऐक्याची सामाजिक झालर आहे. हा सण मुस्लिम बांधवांचा असला, तरी त्यात हिंदू बांधवही मोठ्या संख्येने सहभागी होतात. यंदा सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सव आणि मोहरम एकत्र आल्याने अनेक मांडवांमध्ये गणेशमूर्ती आणि पीर पंजांची एकत्रित प्रतिष्ठापना करण्यात आली होती. यासह शहरातील विविध तालीम संस्थांमध्ये तसेच उपनगरांमध्ये पंजे बसविण्यात आले होते. या कालावधीत पंजे एकमेकांच्या भेटीला जातात.

अखेरच्या दिवशी भागातील पंजांना भाविकांकडून मलिदा, दहीभाताचा नैवेद्य दाखविण्यात आला. दुपारी दोनपासूनच शहरात पंजे विसर्जनाची लगबग सुरू झाली. सायंकाळी पाचनंतर बहुतांश पंजे मिरवणुकीने पापाची तिकटी ते पंचगंगा घाट या मुख्य विसर्जन मार्गावर आले. पंजांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली.

सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भवानी मंडप परिसरात बहुतांश पंजे होते. रात्री साडेनऊपर्यंत १00 हून अधिक पंजांचे विसर्जन झाले. दरम्यान, परंपरेप्रमाणे काही पंजांचे तालमीसमोरच विविध धार्मिक विधींनी विसर्जन झाले. विविधरंगी आकर्षक रांगोळ्यांनी तालीम परिसर सजून गेला. त्यामध्ये बाबूजमाल पीरपंजे, छत्रपतींचे पीरपंजे, उत्तरेश्वर पेठ शिवमंदिर वाचनालय, संध्यामठ गल्ली, राजारामपुरी, मंगळवार पेठ, गुरुवार पेठ, शिवाजी पेठ, यादवनगर, सुभाषनगर परिसरांतील पंजांचा समावेश होता.

अलोट गर्दी... वाहतुकीची कोंडी

ताबूत विसर्जन मिरवणुकीमुळे दुपारी १२ वाजल्यापासून ताबूत विसर्जनापर्यंत बिंदू चौक ते शिवाजी रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-माळकर चौक-पानलाईन - पापाची तिकटी-गंगावेश ते पंचगंगा घाटमार्गावर दुचाकी, कार व जीप ही चारचाकी वाहने वगळून अन्य सर्व वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली होती; मात्र काही खासगी बसेस या मार्गावरून धावत होत्या.

शिवाजी चौकात दोन मंडळांकडून २१ फुटी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. यासह शहरातील गणेशमूर्तींच्या दर्शनासाठी बाहेर पडलेले भाविक आणि पंजे विसर्जन मिरवणुकांची गर्दी एकत्र आल्याने शिवाजी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती.

 

 

Web Title: Immerse the claws in a religious environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.