सोडा वापरून घरच्या घरी करा गणेशमूर्तींचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:27 AM2021-09-04T04:27:41+5:302021-09-04T04:27:41+5:30
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींमुळे पाण्याचे प्रदूषण होते. त्यावरील रंग आरोग्याला हानिकारक असतात यााबाबत नेहमीच चर्चा होते. राज्य शासनाने या ...
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींमुळे पाण्याचे प्रदूषण होते. त्यावरील रंग आरोग्याला हानिकारक असतात यााबाबत नेहमीच चर्चा होते. राज्य शासनाने या मूर्तींवर बंदी आणली आहे. पण प्रत्यक्षात लाखोंच्या संख्येत शाडूच्या मूर्ती बनवणे अशक्य आहे. तेवढ्या प्रमाणात शाडू उपलब्ध होत नाही, ते बनवण्यास वेळ लागतो, शिवाय या मूर्ती नाजूक असल्याने दुखावण्याचा धोका असतो. शिवाय त्यांचा दरही खूप जास्त असतो. तुलनेने सर्वच बाजूंनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घेणे सोयीस्कर असतात. पण या मूर्ती लवकर विरघळत नाहीत. त्यामुळे त्यांचा अवमान होण्याचेच प्रमाण अधिक असते. मोठ्या श्रद्धेने पुजलेल्या या देवाचे विसर्जनही तितक्याच सन्मानाने व्हावे यासाठी संशोधकांनी अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करून मूर्ती विरघळण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे.
हे संशोधन नॅशनल केमिकल लॅबोरेटरीने केले असून त्याला कमिन्स इंडियाच्यावतीने सीएसआरमधून निधी देण्यात आला होता. कोल्हापुरात २०१५ साली पंचगंगा नदी घाटावर पंचगंगा घाट संवर्धन समितीच्यावतीने प्रमोद पुगावकर यांनी पहिल्यांचा हा प्रयोग सगळ्यांसमोर आणलाय
----
पीओपीच्या मूर्तींचीच अधिक विक्री
कोल्हापुर शहरात वर्षाला १ ते दीड लाखांवर गणेशमूर्ती लागतात. त्यापैकी ८० ते ९० टक्के गणेशमूर्ती या प्लॅस्टरपासून बनवलेल्या आहेत. एक लाखामागे २० हजार या प्रमाणे शाडूच्या मूर्ती बनवल्या जातात. शाडूच्या मूर्ती नाजूक असल्याने त्या दुखावण्याची भीती असते. त्यामुळे नागरिकांकडून तसेच मंडळांकडून सर्रास प्लॅस्टरच्या मूर्तीची मागणी केली जाते.
----
असे असावे सोड्याचे प्रमाण
सोड्याचे प्रमाण मूर्तीच्या वजनावरून ठरवले जाते. मूर्तीचे वजन जितके किलो असेल तेवढे किलो अमोनियम बायकार्बोनेट पाण्यात घालायचे. भल्यामोठ्या टबमध्ये खूप पाणी घातले आणि अमोनिअम बायकार्बोनेट कमी पडले की मूर्ती विरघळत नाही. त्यामुळे केवळ मूर्ती पूर्णत: पाण्यात बुडेल आणि भोवतीने थोडे पाणी राहील एवढेच पाण्याचे प्रमाण असायला हवे.
---
४८ तासांत विरघळते मूर्ती
मूर्ती विरघळवण्याच्या दोन पद्धती आहे. पहिल्या पद्धतीत शॉवरप्रमाणे मूर्तीवर संततधार हे पाणी पडत राहिले तर, ४८ तासांत मूर्ती विरघळते. आणि टबमध्ये ठेवून दर चार तासांनी पाणी ढवळले तर, मूर्ती विरघळायला ३ ते ६ दिवस लागतात.
----
खत म्हणून करा पाण्याचा वापर
हे विरघळलेले पाणी तुम्ही झाडाला वापरू शकता व खाली राहिलेले प्लॅस्टर खत म्हणून किंवा सिमेंटच्या विटा बनवणे, प्लॅस्टरच्या भिंती अशा कारणासाठी वापरता येतात. विदर्भात पाऊस कमी पडतो, ऊन जास्त असते, त्यामुळे शेतातील मातीवर प्लॅस्टर मारले जाते. त्यामुळे माती पाणी शोषून घेते.
---
खाण्याचा सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट, अमोनियम बायकार्बोनेट हा पदार्थ वेगळा असते. तो देखील बेकरी पदार्थ बनवण्यासाठी वापरला जातो; पण घराघरांत वापरला जात असलेल्या खाण्याच्या सोड्याने मूर्ती विरघळत नाही. त्यासाठी अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करणे गरजेचे आहे.
प्रमोद पुगावकर (उपाध्यक्ष पंचगंगा घाट संवर्धन समिती)
--
लाखोंच्या संख्येने शाडूच्या गणेशमूर्ती बनवणे अशक्य आहे. शिवाय प्लॅस्टरने प्रदूषण होत नाही. आम्ही कायम प्लॅस्टरमध्ये हात घालून काम करतो. आमच्यावर कोणतेही दुष्परिणाम झालेले नाहीत. रंग विषारी असू शकतात. ही मूर्ती लवकर विरघळत नाही, एवढाच प्रश्न असतो. त्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत.
उदय कुंभार (मूर्तिकार)
---