गारगोटीसह तालुक्यातील घरगुती गणेशाचे भक्तिमय वातावरणात विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:28 AM2021-09-15T04:28:31+5:302021-09-15T04:28:31+5:30
गारगोटी ग्रामपंचायतीने राबविलेल्या मूर्तिदान उपक्रमास सलग दुसऱ्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला. यंदा पाच हजार सातशे मूर्ती संकलित झाल्या. कोरोनाचा ...
गारगोटी ग्रामपंचायतीने राबविलेल्या मूर्तिदान उपक्रमास सलग दुसऱ्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला. यंदा पाच हजार सातशे मूर्ती संकलित झाल्या.
कोरोनाचा संसर्ग टाळून व मूर्ती नदीत विसर्जन न करता पर्यावरणपूरक अभियान अनेक ग्रामपंचायतीने गेल्या वर्षीपासून राबविले आहे. गणेशमूर्ती व निर्माल्य विसर्जनासाठी ग्रामपंचायतीने जलकुंड तयार केले असून ‘ग्रामपंचायत आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत गारगोटी ग्रामपंचायतीने प्रत्येक प्रभागात ट्रॅक्टर व कर्मचारी पाठविले होते. लोकांनी आपल्या मूर्ती त्यांना दान केल्या. मूर्ती नदीत विसर्जित न करता मूर्तिदान उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. ७० वर्षांची परंपरा असलेल्या येथील श्री मौनी विद्यापीठाच्या गणपतीचे मंगळवारी विसर्जन करण्यात आले. सकाळी दहा वाजता गणपतीची भक्तिपूर्वक पूजा आणि आरती करण्यात आली व ग्रामपंचायतीकडे ही मूर्ती दान करण्यात आली. यावेळी मौनी विद्यापीठाचे संचालक डॉ. आर. डी. बेलेकर यांनी ही मूर्ती ग्रामपंचायतचे सरपंच संदेश भोपळे यांच्याकडे सुपुर्द केली. यावेळी प्रा. अरविंद चौगुले, आनंद चव्हाण, मुख्याध्यापक दीपक मोरे, संजय डवरी, अरविंद पलंगे, अनिल देसाई, विलास पाटील, बंडा सुतार, सौ. योगिता कुरळे, सौ. नम्रता वीर आदी शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.