इचलकरंजीत कृत्रिम कुंडात गणेशमूर्तीचे विसर्जन, प्रशासन-लोकप्रतिनिधींच्या बैठकीत झाला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 11:20 AM2022-08-26T11:20:20+5:302022-08-26T11:20:48+5:30

शहापूर खणीची सद्य:स्थिती पाहता तेथे गणेशमूर्ती विसर्जन करण्यास सर्व स्तरांतून विरोध होत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीत विसर्जन करण्याबाबत चर्चा सुरू झाली. हा वाद मंत्रालयापर्यंत पोहोचला.

Immersion of Ganesha idol in Ichalkaranjit artificial tank, decision was taken in the meeting of administration and public representatives | इचलकरंजीत कृत्रिम कुंडात गणेशमूर्तीचे विसर्जन, प्रशासन-लोकप्रतिनिधींच्या बैठकीत झाला निर्णय

इचलकरंजीत कृत्रिम कुंडात गणेशमूर्तीचे विसर्जन, प्रशासन-लोकप्रतिनिधींच्या बैठकीत झाला निर्णय

Next

इचलकरंजी : शहरातील गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी नदीवेस नाका ते यशोदा पूल परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या व्यासाचे व जास्त खोलीचे कृत्रिम कुंड महापालिका प्रशासन तयार करणार. त्याठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाची सोय केली जाणार असून, कुंड भरल्यास उर्वरित मूर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीत करण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.

शहरातील गणेशमूर्ती विसर्जनसंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नावर प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस आमदार आवाडे यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रशासक सुधाकर देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपअधीक्षक बाबूराव महामुनी, अप्पर तहसीलदार शरद पाटील उपस्थित होते.

शहापूर खणीची सद्य:स्थिती पाहता तेथे गणेशमूर्ती विसर्जन करण्यास सर्व स्तरांतून विरोध होत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीत विसर्जन करण्याबाबत चर्चा सुरू झाली. हा वाद मंत्रालयापर्यंत पोहोचला. पर्यावरणमंत्र्यांनी बैठक घेतली आणि सर्वमान्य तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार याबाबत प्रशासनाने महापालिकेत आमदार आवाडे यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीमध्ये संपूर्ण ऊहापोह करण्यात आला. त्यानंतर परंपरागत शिवतीर्थ ते नदीवेस नाका असा विसर्जनाचा मार्ग कायम राहील.

नदीवेस नाक्यापासून यशोदा पुलापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला शक्य त्याठिकाणी मोठे कृत्रिम कुंड व तलाव तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच शहरातही ठिकठिकाणी विविध शंभर कृत्रिम विसर्जन कुंड तयार करून त्यामध्ये पंचगंगा नदीचे पाणी सोडून भाविकांना तेथे विसर्जनाचे आवाहन करण्याचे ठरले. कुंडामध्ये विसर्जन केलेल्या व दान केलेल्या गणेशमूर्तींचे योग्य ठिकाणी विसर्जित केल्या जातील, याची पुरेपूर काळजी प्रशासन घेईल. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी व्यवस्थांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले.

महापालिकेने युद्धपातळीवर काम पूर्ण करून आवश्यक तेथे कृत्रिम तलाव तयार करावेत. योग्य पर्यायी व्यवस्था उभारल्यास त्याला सहकार्य करू परंतु संबंधित तलाव व कुंड भरल्यास पंचगंगा नदीत विसर्जन केले जाईल, असे आमदार आवाडे यांनी सांगितले.

प्रशासनाने सोय केलेल्या शहापूर खणीत प्रदूषित पाणी असल्याने जनभावना दुखावली जाऊ शकते. त्यामुळे त्याला पर्याय देण्याची गरज होती. आज झालेल्या बैठकीत जे पर्याय सुचवले आहेत, ते आमदार आवाडे यांनी मान्य केले आहेत. साधारण तीन वर्षांनंतर मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत असून, जिल्ह्यातील मूर्ती दान चळवळीची केंद्र शासनानेही दखल घेतली आहे. या विषयावर सकारात्मक चर्चा झाली असून, इचलकरंजी हे संवेदनशील शहर असल्याने उत्सवकाळात कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही, याची पोलीस प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे. सार्वजनिक मंडळांनीही जलकुंडांचा वापर करावा तसेच आवाजाच्या मर्यादेचे पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी केले.

शहापूर खणीची पाहणी

बैठकीस उपस्थित असलेले सर्व प्रशासकीय अधिकारी व आमदार आवाडे यांनी बैठकीनंतर शहापूर खणीची पाहणी केली. खणीमध्ये अतिशय प्रदूषित पाणी असून, पाण्यामध्ये तुरटी व ब्लिचिंग पावडर टाकून स्वच्छता करावी तसेच कारंजा व सुशोभिकरण करावे, अशा सूचना अधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या.

विविध ठिकाणी पाहणी

शहरातील नदीवेस परिसरासह मिरवणूक मार्ग व विविध कुंड निर्माण करण्यासाठी योग्य असणाऱ्या ठिकाणी पथकाने पाहणी केली तसेच ताबडतोब कुंड तयार करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली.

Web Title: Immersion of Ganesha idol in Ichalkaranjit artificial tank, decision was taken in the meeting of administration and public representatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.