पंचगंगेतच गणेशमूर्ती विसर्जनाला परवानगी, आवाडेंची मागणी म्हणजे मूर्तिदान चळवळीला खोडा
By समीर देशपांडे | Published: August 12, 2022 12:47 PM2022-08-12T12:47:57+5:302022-08-12T12:59:44+5:30
आवाडेंच्या या मागणीमुळे फडणवीसही अडचणीत येण्याची शक्यता
समीर देशपांडे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने रुजत चाललेल्या गणेशमूर्ती आणि निर्माल्य दान चळवळीला नख लावण्याची भूमिका आमदार प्रकाश आवाडे यांनी घेतली आहे. पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जन करू नये असे न्यायालयाचे आदेश डावलून जर आवाडे ही भूमिका घेणार असतील, तर तो न्यायालयाचा अवमान ठरेलच. परंतु, जिल्ह्यातील एका विधायक परंपरेचा बळी घेण्याचे पाप आवाडे आणि भाजपच्या नावावर यानिमित्ताने जमा होणार आहे. आवाडेंची मागणी म्हणजे चक्र उलटे फिरविण्याचा प्रकार आहे.
काँग्रेस सोडून भाजपच्या जवळ गेलेल्या आवाडे यांनी आपण भाजपवाल्यांपेक्षाही किती कट्टर हिंदुत्ववादी आहोत हे दाखविण्यासाठी स्वत:शीच स्पर्धा सुरू केली आहे. त्यांची गेल्या एक, दीड वर्षातील भाषणेच खूप काही सांगून जातात. परंतु, बोलण्यापेक्षा त्यांनी घेतलेली ही नवी भूमिका पंचगंगा नदीसाठी मारक आहे. इचलकरंजीतील गणेशभक्तांच्या विनंतीनुसार पंचगंगा नदीत घरगुती आणि सार्वजनिक मूर्ती विसर्जित करण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आवाडे यांनी परवानगी मिळवली आहे.
पंधरा वर्षांपूर्वीपासून पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा गाजत आहे. यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिकाही दाखल झाल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांना यासाठी आढावा बैठक घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. पंचगंगेतील प्रदूषणाला इचलकरंजीतील कापड उद्योगातील अनेक त्रुटी कशा कारणीभूत आहेत याची आकडेवारी दरवर्षी प्रसिद्ध होते.
याच आवाडे यांनी प्रयाग चिखलीपासून काढलेल्या प्रदूषणमुक्तीच्या यात्रेमध्ये कोल्हापुरातील दसरा चौक मैदानावर पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी शिरा ताणून भाषण केले होते. असे असताना आवाडे यांनी सर्व मूर्ती नदीमध्ये विसर्जित करण्याची परवानगी आणून आपल्याच भूमिकेपासून लांब पलायन केले आहे. जिल्ह्यातील हजारो नागरिकांना पंचगंगा आपल्यामुळे आणखी प्रदूषित होऊ नये अशी भूमिका पटली असताना, लाखो मूर्ती दरवर्षी पर्यायी व्यवस्थेद्वारे विसर्जित केल्या जात असताना केवळ मतांसाठी जर आवाडे अशी पर्यावरणविरोधी भूमिका घेणार असतील, तर ते विधायकतेचे चक्र उलटे फिरवल्यासारखे होईल.
कोल्हापूरचा राज्याला आदर्श
जिल्ह्यात २०१५ पासून आतापर्यंत घरगुती १६ लाख ४१ हजार १०२ मूर्ती विसर्जित करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक १२,६७४ मूर्ती आणि एकूण १६,५३,७७६ मूर्ती विसर्जित करण्यात आल्या आहेत. ११८१ घंटागाड्या आणि ८३१४ ट्राॅली भरून निर्माल्य संकलित करण्यात आले आहे. कोल्हापूरने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा राज्यात एक आदर्श घालून दिला आहे. मात्र, आवाडे यांच्यासारखे सुसंस्कृत लोकप्रतिनिधी याउलट कशी भूमिका घेतात याचे अनेकांना कोडे पडले आहे.
आवाडे फडणवीसांना आणणार अडचणीत
नदीमध्ये मूर्ती विसर्जित करू नये असे उच्च न्यायालयाचे १३ आदेश आहेत. हरित लवादानेही असे निर्णय दिले असून, प्रदूषण नियंत्रण मंडळालाही याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. १८३/२०१२ या क्रमांकाने पंचगंगा प्रदूषणाची याचिका उच्च न्यायालयात आहे. हे सर्व डावलून पंचगंगेतच मूर्ती विसर्जन करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आवाडे यांनी परवानगी आणली आहे. त्यामुळे आवाडेंच्या या मागणीमुळे फडणवीसही अडचणीत येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीनेही अशी परवानगी कशी दिली याबद्दलही लोकांत संतप्त भावना आहेत.
शिव्याशापानंतर मिळतोय प्रतिसाद
मूर्ती आणि निर्माल्यदान चळवळीला कोल्हापूर जिल्ह्यात सहजासहजी यश मिळालेले नाही. यामध्ये डाव्या, पुरोगामी विचारांचे विज्ञानवादी, रंकाळा बचावचे कार्यकर्ते आणि जिल्हा परिषद, महापालिका प्रशासन यांच्यासह सर्वसामान्य नागरिकही सहभागी झाले. पहिल्यांदा अनेकांना शिव्याही खायला लागल्या. त्यानंतर आपले पाणवठे आपणच स्वच्छ ठेवायला पाहिजे अशी भूमिका घेऊन नागरिकांनी ही चळवळ मनावर घेतली. निव्वळ मतांसाठी त्या चळवळीला मागे वळविण्याचे पाप आवाडे यांनी करू नये.