‘अमर रहे’च्या घोषामध्ये अटलजींच्या अस्थींचे पंचगंगा नदीमध्ये विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 07:32 PM2018-08-25T19:32:15+5:302018-08-25T19:34:13+5:30
‘अमर रहे, अमर रहे, अटलजी अमर रहे...’च्या घोषामध्ये माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे शनिवारी सकाळी पंचगंगा नदीमध्ये विसर्जन करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे यावेळी नदीपर्यंत चालत सहभागी झाले होते.
कोल्हापूर : ‘अमर रहे, अमर रहे, अटलजी अमर रहे...’च्या घोषामध्ये माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे शनिवारी सकाळी पंचगंगा नदीमध्ये विसर्जन करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे यावेळी नदीपर्यंत चालत सहभागी झाले होते.
शनिवारी सकाळी १० वाजता दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून बिंदू चौक येथे आणण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिल्यानंतर अस्थिकलश पंचगंगा घाटाकडे रवाना करण्यात आला.
चारचाकी वाहनावर फुलांनी सजविलेल्या उंचवट्यावर अस्थिकलश ठेवण्यात आला होता. यावेळी स्पीकरवर अटलबिहारींची भाषणे आणि कविता लावण्यात आल्या होत्या. पालकमंत्री पाटील, आमदार अमल महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, सुभाष वोरा, बाबा देसाई हे सर्वजण या वाहनाच्या मागून चालत निघाले.
देवल क्लबजवळ पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर हेदेखील या सर्वांसोबत सहभागी झाले. मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेशमार्गे सर्वजण पंचगंगा घाटावर आले. वाटेमध्ये अनेक ठिकाणी नागरिक, पदाधिकारी आणि विविध संघटनांच्यावतीने अस्थिकलशावर फुले अर्पण करण्यात आली. मंत्री पाटील यांच्या हस्ते अस्थिविसर्जन करण्यात आले.