corona virus-परदेशातून परतणाऱ्यांनी होम कोरोंटाईन करून घ्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 06:23 PM2020-03-18T18:23:42+5:302020-03-18T18:25:00+5:30
परदेश तसेच जिल्ह्याबाहेरून प्रवास करून जिल्ह्यात आलेल्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करून १४ दिवस घरीच स्वत:ला होम कोरोंटाईन करून घेऊन सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.
कोल्हापूर : परदेश तसेच जिल्ह्याबाहेरून प्रवास करून जिल्ह्यात आलेल्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करून १४ दिवस घरीच स्वत:ला होम कोरोंटाईन करून घेऊन सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली असून, आवश्यक उपाययोजना राबविण्यास प्राधान्य दिले आहे. त्या अनुषंगानेच बाहेरून येणाऱ्या नागरिकांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने या व्यक्तींनी घरातच राहणे योग्य आहे, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी आपल्या जनतेसाठी काढलेल्या निवेदनात म्हटले आहे.
जिल्ह्यात बाहेरून तसेच परदेश प्रवास करून काही लोक आले आहेत, येत आहेत, येणार आहेत. याबरोबरच मुंबई, पुणे व राज्याच्या अन्य काही भागांतून लोक स्वत:च्या मूळ गावी येत आहेत. बाहेरून आलेल्या लोकांच्या तपासणीची सोय छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात केली आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार अशा व्यक्तींनी शक्यतो घराबाहेर पडू नये. ज्यांना होम कोरोंटाईन सल्ला दिला आहे, त्यांनी आपल्या घरामध्येच सुरक्षित राहावे, जेणेकरून कोरोना विषाणूचा संसर्ग इतरांना होणार नाही.
बाहेरून येणाऱ्या व्यक्तींनी इतरांशी संपर्क टाळावा; जेणेकरून आपल्या कुटुंबातील अन्य व्यक्ती, समाज व कोल्हापूर जिल्हा कोरोना या विषाणूपासून सुरक्षित ठेवता येईल. यासाठी अशा व्यक्तींनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन देसाई यांनी केले.