अंध, अपंग, वृद्धांनी अनुभवला शाही स्वागत सोहळा -: बागवान कुटुंबीयांचा अनोखा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 09:31 PM2019-11-02T21:31:12+5:302019-11-02T21:34:26+5:30
महासैनिक दरबार हॉल येथे शनिवारी झालेल्या स्वागत समारंभास कोल्हापुरातील अपंग संस्था, वृद्धाश्रम, अंधशाळा, निराधारांसाठी काम करणाऱ्या १४ सामाजिक संस्थेतील विशेष पाहुणे उपस्थित राहून, नववधूला आशीर्वाद देऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली.
कोल्हापूर : लग्न सोहळा म्हणजे दागदागिने, कपडेलत्ते, नातेवाईक आणि आप्तस्वकीयांचा मेळा असे चित्र आजकालच्या विवाह सोहळ्यांमध्ये पाहण्यास मिळते. मात्र, या सर्व गोष्टींना फाटा देत कोल्हापुरातील इस्माईल (बिजू) बागवान यांनी सामाजिक बांधीलकी जपत आपल्या मुलांचा स्वागत समारंभ अंध, अपंग, निराधार संस्थेतील मुलांसह वृद्धाश्रमातील लोकांच्या साक्षीने थाटात साजरा केला.
महासैनिक दरबार हॉल येथे शनिवारी झालेल्या स्वागत समारंभास कोल्हापुरातील अपंग संस्था, वृद्धाश्रम, अंधशाळा, निराधारांसाठी काम करणाऱ्या १४ सामाजिक संस्थेतील विशेष पाहुणे उपस्थित राहून, नववधूला आशीर्वाद देऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली.
इस्माईल, झाकीर आणि इकबाल या बागवान बंधंूचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. इस्माईल यांची मुलगी सीमा ही १४ वर्षांची असताना तिचे निधन झाले. तिची उणीव बागवान कुटुंबीयामध्ये नेहमी जाणवत होती. इस्माईल यांचा मुलगा सकलेन यांचे लग्न निपाणी येथील स्वालिहा हिच्यासोबत काल पार पडले. तिच्या रूपाने आपल्या घरी पुन्हा एकदा मुलगी आली आणि समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या हेतूने त्यांनी या स्वागत सोहळ्याचे आयोजन केले होते.
नेहमीचे पाहुणे, नातेवाईक या ना त्या कारणाने भेटतात. चर्चा करतात. तोच आनंद समाजातील दुर्लक्षितांनाही मिळावा या हेतूने बागवान कुटुंबीयांनी या पाहुण्यांना आमंत्रित केले होते. हॉलमध्ये विशेष पाहुणे येताच त्यांचे स्वागत वाजत गाजत करण्यात येत होते. त्यांना बागवान कुुटुंबीय आदराने खुर्चीवर बसवत, फेटे बांधण्यात येत होते.
आपले अनोख्या पद्धतीचे स्वागत पाहून हे विशेष पाहुणे भारावून गेले.
मनसोक्त पाहुणचार आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमामुळे या अंध, अपंग, निराधार, वृद्ध पाहुण्यांच्या चेहºयावर समाधान दिसत होते. बागवान कुटुंबीयांकडून मिळालेल्या अनोख्या पाहुणचाराने पाहुणे भारावून गेले. नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी आमदार चंद्रकांत जाधव, मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर, माजी महापौर सागर चव्हाण, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
समाजातील सामाजिक संस्थांना पुरेशी मदत तर मिळते, मात्र त्यांना अशा एखाद्या शुभ सोहळ्याला प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी क्वचितच मिळते. मुलीच्या स्मृतिप्रीत्यर्थ व समाजाचे काही देणे लागतो या उद्देशाने आमच्या कुटुंबीयांनी या स्वागत सोहळ्याचे आयोजन केले होते. यामधून आम्हाला आत्मिक समाधान मिळाले.
- इस्माईल बागवान
-------------------------
अनोखे उद्घाटन....
बागवान बंधंूचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. लग्न सोहळा व इतर कार्यक्रमासाठी लागणारे साहित्य त्यांनी खरेदी केले होते. त्यांची मांडणी हॉलमध्ये केली होती. यामध्ये विशेषकरून सोफा सेट, खुर्ची, डायनिंग टेबल अशा वस्तू होत्या. अंध, अपंग आणि वृद्धाश्रमातील पाहुण्यांना यावर बसवून त्यांनी या साहित्यांचे उद्घाटन यानिमित्ताने केले.