Kolhapur: तोतया आयकर अधिकाऱ्यांनी चहावाल्याच्या घरातून ४५ हजार लुटले, व्यापारी वर्गात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 18:55 IST2024-12-31T18:54:32+5:302024-12-31T18:55:52+5:30
तुम्ही शासनाचा कर चुकवून भरपूर पैसे कमावले आहेत असे म्हणत दरवाजे बंद करून मोबाईल काढून घेत घरातील सर्व साहित्य विस्कटून टाकले

Kolhapur: तोतया आयकर अधिकाऱ्यांनी चहावाल्याच्या घरातून ४५ हजार लुटले, व्यापारी वर्गात खळबळ
गांधीनगर: आयकर अधिकारी असल्याचा बहाणा करून अज्ञात चार ते पाच जणांनी एका चहावाल्याच्या घरातून ४० ते ४५ हजार रुपये लुटण्याचा प्रकार गांधीनगरमध्ये सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडला. या प्रकारामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.
याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, रेल्वे स्टेशन रोडवर एका चहावाल्याची टपरी आहे. सेंट्रल पंचायतीच्या मागील बाजूस एका साध्या घरामध्ये त्या चहा टपरीवाल्याचे वास्तव्य आहे. सोमवारी एक महिला आणि तीन अज्ञातांनी आम्ही आयकर अधिकारी आहोत असे सांगून घरात शिरले. घरामध्ये एक महिला आणि त्यांचा मुलगा असे दोघे होते. अचानक तीन ते चार जण घरामध्ये येऊन तुम्ही टॅक्स भरता का, आम्हाला तुमचे घर तपासायचे आहे. तुम्ही प्रचंड पैसे मिळवलेले आहेत. तुम्ही शासनाचा कर चुकवून भरपूर पैसे कमावले आहेत असे म्हणत दरवाजे बंद करून मोबाईल काढून घेत घरातील सर्व साहित्य विस्कटून टाकले आणि घरातील कपाटामधील ४० ते ४५ हजार रुपये घेऊन पसार झाले.
हा प्रकार अर्धा ते पाऊण तास सुरू होता. या घटनेमुळे गांधीनगर भागात खळबळ उडाली असून व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत गांधीनगर पोलिस ठाण्यात कोणतीही या घटनेची नोंद केली नाही. पोलिसांचा चौकशीचा ससेमिरा उगाच नको म्हणून या घटनेची नोंद किंवा तक्रार पीडित कुटुंबीयांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात दिली नाही, असे सूत्राकडून समजते.