कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2017 01:05 AM2017-06-02T01:05:28+5:302017-06-02T01:05:28+5:30
कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००३ ची काटेकोर अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी गुरुवारी येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी राजर्षी शाहू महाराज शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. एल. एस. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुप्रिया देशमुख,डॉ. पराग वाटवे, प्रा. डॉ. शिंदे, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सुकुमार चौगुले, मोहन केंबळकर आदी प्रमुख उपस्थित होते.
सुभेदार म्हणाले, जगामध्ये दरवर्षी जवळपास ६० लाख लोकांचा तर भारतात सुमारे १० लाख लोकांचा मृत्यू हा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वरील कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे शासकीय यंत्रणांनी करावी. सर्व शासकीय आस्थापना तंबाखूमुक्त असल्या पाहिजेत यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले, तंबाखू सेवनाने अन्य आजारही उद्भवतात. हे सर्व टाळण्यासाठी समाजात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या धोक्याबद्दल जनजागृती व्यापक प्रमाणात होणे आवश्यक आहे. या संदर्भातील कायद्याचे ‘कलम ४’ सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी, उल्लंघन केल्यास दंड, ‘कलम ५’ तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातींवर बंदी, ‘कलम ६ अ’ अल्पवयीन व्यक्तीस तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे या दंडनीय गुन्हा, ‘कलम ६ ब’ शैक्षणिक संस्थांच्या परिसरापासून १०० यार्ड परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी, या बाबतचा सूचनाफलक आणि आणि पदार्थाच्या वेस्टनावर धोक्याची सूचना आदी सर्व कलमांचे काटेकोर पालन
करावे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करु नये.