उत्पन्नवाढीसाठी नवीन उपाययोजना राबवू
By admin | Published: April 3, 2017 12:39 AM2017-04-03T00:39:23+5:302017-04-03T00:39:23+5:30
महापालिका : नूतन आयुक्त अभिजित चौधरी यांची ग्वाही; मूलभूत गरजांनाही प्राधान्य
तानाजी पोवार -- कोल्हापूर --नागरिकांच्या मूलभूत गरजांसह उद्यान, शहरातील वाहतुकीची समस्या या प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष देणार असून, महानगरपालिकेच्या उत्पन्नवाढीसाठीही नवीन उपाययोजनांवर भर देणार असल्याची ग्वाही कोल्हापूर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मावळते आयुक्त पी. शिवशंकर यांची परभणी येथे जिल्हाधिकारी पदावर बढतीवर बदली झाल्याने त्यांच्या जागी भंडारा येथील जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांची नियुक्ती झाली आहे. ते रविवारी सायंकाळी कोल्हापुरात आले. डॉ. चौधरी हे आज, सोमवारी सकाळी १० वाजता कोल्हापूर महानगरपालिकेत येऊन ११ वाजता पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
कोल्हापूरला आपण प्रथमच आलो असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले. ते म्हणाले, प्रथम कोल्हापूरचे प्रश्न प्राधान्याने समजावून घेणार आहे. कोल्हापूर शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याने त्याचाही शहराच्या पर्यटनवाढीसाठी कसा वापर करता येईल, याकडेही प्राधान्याने पाहणार आहे. कोल्हापूरच्या नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर मी जास्तीत जास्त अभ्यास करून ते मी तातडीने सोडविण्यावर भर देणार आहे. शहरातील पाणीप्रश्न बऱ्यापैकी निकालात निघाल्याचे समजते. तरीही त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू देणार नाही. मावळते आयुक्त पी. शिवशंकर हे माझेच बॅचमेंट असल्याने त्यांनी बऱ्यापैकी कोल्हापूरची ओळख कागदोपत्री करून दिली आहे. त्यांनी राबविलेल्या योजना आणखी ह्यापुढे चालूच ठेवणार आहे.
यांना देणार प्राधान्य...
शहरातील वातावरण प्रदूषणविरहित राहावे. वृद्ध, बालकांसाठी उद्याने विकसित करण्याचाही विचार आहे. त्यामुळे धकाधकीच्या वातावरणातही विरंगुळा घेता येईल.
नागरिकांना आॅनलाईनने जन्म, मृत्यू दाखले देण्याची सुविधा प्राधान्याने राबविण्याचा विचार आहे.
डॉ. चौधरी हे जळगाव जिल्ह्यातील असून २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. औरंगाबादला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी दोन वर्षे काम केले आहे. भंडारा येथे ते जिल्हाधिकारी होते. ते एम.बी.बी.एस. आहेत.