सरकारी रुग्णालयातील यंत्रणा कार्यान्वित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:23 AM2021-04-11T04:23:35+5:302021-04-11T04:23:35+5:30
कोल्हापूर : कोरोना संसर्गाचा मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेऊन या वर्षीही महापालिका, आयजीएम, सीपीआर आणि गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाची यंत्रणा ...
कोल्हापूर : कोरोना संसर्गाचा मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेऊन या वर्षीही महापालिका, आयजीएम, सीपीआर आणि गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाची यंत्रणा पूर्ण क्षमतेने उपचारासाठी कार्यान्वित करावी, असा आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, महापालिकेने आपली यंत्रणा सक्रिय करून मागील वर्षाप्रमाणे कोविड आरोग्य केंद्रे सुरू करावीत. हॉटेलचालकांशी चर्चा करून यावर्षीही रुग्णांसाठी सुविधा देण्यासाठी तयारी करावी. फायर ऑडिटनुसार सीपीआरमध्ये तात्काळ दुरुस्ती करावी. कोणतीही दुर्घटना घडणार नाही याबाबत सर्वच यंत्रणांनी दक्षता घ्यावी. प्रत्येक विभागप्रमुखांनी समन्वय ठेवून आपापली जबाबदारी पार पाडावी.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले की, शासन निर्देशाप्रमाणे औद्योगिक आणि व्यापारी घटकांतील व्यक्तींची तपासणी करून निगेटिव्ह अहवालानंतर त्यांचे लसीकरण केले जाईल. त्यासाठी संपर्क अधिकारी नेमण्यात येतील, तसेच रुग्णालयातील खाटांच्या व्यवस्थापनासाठी महापालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागात तीन शिफ्टमध्ये संपर्क अधिकारी नेमण्यात येतील. ते रुग्णांचा प्रवेश आणि डिस्चार्ज याबाबत मॉनिटरिंग करतील. तपासणी वाढवण्यावरही भर द्यावा. गृहअलगीकरणाबाबत तपासणी करूनही त्यावर मॉनिटरिंग करावे.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, उपायुक्त निखिल मोरे, मुख्य लेखा व वित्तअधिकारी संजय राजमाने, केएमएच्या अध्यक्षा डॉ. आशा जाधव आदींची उपस्थिती होती.
---
फोटो नं १००४२०२१-कोल-कोरोना बैठक
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी झालेल्या कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
--