नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी गतीने करा - उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 06:36 PM2022-11-19T18:36:06+5:302022-11-19T18:36:43+5:30

डिजीलॉकरसारख्या नवतंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थीभिमुखता विकसित करावी

Implement the new education policy at speed says Higher and Technical Education Minister Chandrakant Patil | नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी गतीने करा - उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी गतीने करा - उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

googlenewsNext

कोल्हापूर : नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी शिवाजी विद्यापीठाने गतीने करावी. या धोरणामधील विविध उच्चशिक्षण, कौशल्यविकासाच्या संधी व्यापक समाजघटकांपर्यंत नेण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने काम करावे. डिजीलॉकरसारख्या नवतंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थीभिमुखता विकसित करावी, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्रीचंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे केले. शिक्षण, संशोधनात विद्यापीठ अग्रेसर असून सामाजिक बांधिलकीही कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवाजी विद्यापीठाच्या हीरकमहोत्सवी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहातील या कार्यक्रमास दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय डी. सावंत प्रमुख उपस्थित, तर अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

कृषी व अकृषी विद्यापीठांमध्ये सुसंवाद प्रस्थापित होऊन तो वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाने वर्धापनदिन समारंभास प्रथमच कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना आमंत्रित करून सकारात्मक पाऊल उचलले आहे. मूलभूत संशोधनाचे उपयोजित संशोधन, तंत्रज्ञानात रूपांतर करून त्याचे लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे कुलगुरू डॉ. सावंत यांनी सांगितले. विद्यार्थीकेंद्री उपक्रम राबविण्यामध्ये शिवाजी विद्यापीठ सदैव आघाडीवर आहे. नवे शैक्षणिक धोरण राबविण्याच्या दिशेनेही विद्यापीठाने आघाडी घेतली असल्याचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले.

या कार्यक्रमात मंत्री पाटील यांच्या हस्ते विद्यापीठ गीताचे लोकार्पण करण्यात आले. गीतकार प्रा. गोविंद काजरेकर, प्रवीण बांदेकर, संगीतकार अमित साळोखे, आदींचा सत्कार करण्यात आला. विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. एम. जी. ताकवले, भारती पाटील, आदी उपस्थित होते. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी स्वागत केले. धैर्यशील यादव, नंदिनी पाटील, सुश्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

मत्स्यालयाला निधी शासन देणार

कुलगुरू डॉ. सावंत यांनी शिवाजी विद्यापीठात मत्स्यालय उभारण्यासाठी सहकार्य केले जाईल, असे सांगितले. त्यावर मंत्री पाटील यांनी त्यासाठी लागणाऱ्या सर्व निधी राज्य शासनामार्फत देण्याची ग्वाही दिली.

सुवर्णमहोत्सव निधीतील साडेपाच कोटी मिळाले

मंत्री पाटील यांनी ग्वाही दिल्याप्रमाणे विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सव निधीपैकी ५ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी गुरुवारी शासनाकडून प्राप्त झाल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी दिली.

शिवाजी विद्यापीठ गीत...

कीर्ती तुझी मंगलमय स्मरणी असू दे
ज्ञान हेच अमृत हे ब्रीद वसू दे.
सांगू वसा छत्रपती शिवरायांचा
राजर्षी शाहूंच्या लोकहिताचा
सत्य न्याय समतेच्या सत्त्वशीलाचा
हेच स्वप्न मनोमनी सदा नांदू दे
ज्ञान हेच अमृत हे ब्रीद वसू दे.
ज्ञानाचे विद्येचे विश्व उमलू दे
जात धर्म वर्ण वंश भेद मिटू दे
मातीतून उगवूदेत रंग कलेचे
प्रज्ञेची प्रतिभेची प्रभा दिसू दे
ज्ञान हेच अमृत हे ब्रीद वसू दे.
विज्ञाना सदोदित घेत साथीला
शिक्षणाचा नित्य नवा मार्ग शोधिला
राष्ट्रप्रेम मानवता-धर्म मानिला
संचित हे श्वासांतून सतत वाहू दे
ज्ञान हेच अमृत हे ब्रीद वसू दे.
श्रम आणि ज्ञानाचा सेतू बांधूनी
बहुजनां उजेडी नेई तमातूनी
कला क्रीडा शोधांची जननी होऊनी
विद्यापीठ आपुले जगी गर्जू दे
ज्ञान हेच अमृत हे ब्रीद वसू दे.

Web Title: Implement the new education policy at speed says Higher and Technical Education Minister Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.