सफाई कर्मचाऱ्यांना राहती घरे देणार, कल्याणकारी योजना राबवा : सारवान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 06:15 PM2020-03-05T18:15:20+5:302020-03-05T18:20:25+5:30
कोल्हापूर शहरातील सफाई कर्मचाऱ्यांना त्यांची राहती घरे नावावर करून द्या, असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मुकेश सारवान यांनी महापालिका प्रशासनास दिले. सफाई कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या कल्याणकारी योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
कोल्हापूर : शहरातील सफाई कर्मचाऱ्यांना त्यांची राहती घरे नावावर करून द्या, असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मुकेश सारवान यांनी महापालिका प्रशासनास दिले. सफाई कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या कल्याणकारी योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष सारवान यांनी महानगरपालिकेस भेट देऊन तेथील सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या, कामातील अडचणी, रिक्तपदे, पदोन्नती, घरे, वेतन व भत्ते या अनुषंगाने प्रशासनाकडून माहिती घेतली तसेच त्यावर चर्चा केली.
आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड यांनी आयोगाचे अध्यक्ष सारवान यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी झालेल्या चर्चेतून सफाई कर्मचाऱ्यांची रिक्तपदे भरण्यात तसेच त्यांना मोफत घरे देण्यास, पदोन्नती देण्यास अडचणी असल्याची बाब निदर्शनास आली. त्यावेळी आयोगाच्या अध्यक्षांनी तातडीने रिक्त पदे भरा तसेच ती लोकसंख्येच्या तुलनेत भरा, त्यांना राहती घरे त्यांच्या नावावर करून द्या, असे निर्देश दिले.
महापालिकेत रिक्त असलेली आठ रिक्त पदे तसेच लोकसंख्येच्या प्रमाणानुसार १००० लोकसंख्ये मागे पाच कर्मचारी नेमणुकीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल, त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, असे आयुक्त कलशेट्टी यांनी सांगितले.
आयोगाचे अध्यक्ष सारवान यांनी हंगामी व रोजंदारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळते का, लाड कमिटीच्या शिफारशी लागू आहेत का, कर्मचाऱ्यांना वाहनभत्ता, गणवेश, धुलाईभत्ता दिला जातो का, याची खात्री करून घेतली. उपस्थित कर्मचाऱ्यांनीही या सुविधा दिल्या जात असल्याचे सांगितले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, लेखा परीक्षक संजय सरनाईक उपस्थित होते. बैठक सुरू होण्यापूर्वी प्रभारी महापौर संजय मोहिते, स्थायी सभापती संदीप कवाळे उपस्थित होते. गीता सोनवाल, रिना टिंबोळे, भारती वालेकर यांचा आयोगातर्फे सत्कार करण्यात आला.
चारशे रुपये दुलाई भत्ता द्या!
सारवान यांनी धुलाईभत्ता मिळतो का असे सर्व कर्मचाऱ्यांना विचारले तेव्हा तो मिळतो एवढेच सांगितले, पण तो किती मिळतो सांगितले नाही. चौकशी करता तो प्रति महिना ५० रुपये मिळत असल्याची बाब निदर्शनास आली. तेव्हा अध्यक्ष सारवान यांनी तत्काळ ४०० रुपये धुलाई भत्ता सुरूकरा, असे निर्देश दिले. आयुक्तांनी ही बाब मान्य केली.
शासन निर्णयानुसार घरे द्या
आयोगाची बैठक सुरू होण्यापूर्वी शिवसेनेचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी आयोगाचे अध्यक्ष सारवान यांची भेट घेऊन फिरंगाई परिसरातील कामगार चाळीतील सफाई कर्मचाऱ्यांना तातडीने राहती घरे मोफत द्यावीत, अशी मागणी केली. शासन अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, पैसे भरण्याची सक्ती केली जाते, ती रद्द करावी अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा इंगवले यांनी दिला.