दुष्काळावर उपाययोजना राबवाव्यात
By admin | Published: April 18, 2016 12:08 AM2016-04-18T00:08:01+5:302016-04-18T01:10:08+5:30
के. पी. विश्वनाथ : माजी विद्यार्थ्यांचा ‘कृषी संगम’ उत्साहात; शेती, शेतकऱ्यांच्या विकासासाठी योगदान द्या
कोल्हापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थिती डोळ्यांसमोर ठेवून कृषी विद्यापीठे कार्यरत आहेत; पण त्याबरोबर कृषी पदवीधर, निवृत्त अधिकाऱ्यांनी दुष्काळावर उपाययोजनांवर आधारित विशेष कार्यक्रम हाती घ्यावेत. हवामान, पाऊस यानुसार शेती उत्पादन घेण्याचे व शेती उत्पादनाला बाजारपेठा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर माजी विद्यार्थी संघटनेने भर द्यावा, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरूडॉ. के. पी. विश्वनाथ यांनी रविवारी येथे केले.
कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आयोजित ‘कृषी संगम २०१६’ या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकॉकमधील एशिया पॅसिफिक असोसिएशन अॅग़्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूशनचे कार्यकारी सचिव डॉ. रघुनाथ घोडके, तर माजी प्राचार्य एम. डी. जांभळे, प्राचार्य गजानन खोत, प्राचार्य अरुण मराठे प्रमुख उपस्थित होते.
डॉ. विश्वनाथ म्हणाले, कृषी महाविद्यालयाचे मूळ उद्दिष्ट शेतकऱ्यांचे हिताचे रक्षण करणे असल्याने कृषी पदवीधर व निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी सक्रिय योगदान द्यावे. कृषी पदवीधर माजी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यावर भर द्या. शेतकऱ्यांना साहाय्यभूत ठरणाऱ्या कार्यक्रमांच्या योजना तयार करा. त्यांना प्रोत्साहन द्यावे. शिवाय संघटनेने स्वत:चा एनजीओ अथवा फोरम निर्माण करून महाविद्यालयास शेतकऱ्यांना मदत करावी.
डॉ. घोडके म्हणाले, शेतकऱ्यांसाठी माजी विद्यार्थ्यांनी सक्रिय योगदान द्यावे. याअंतर्गत त्यांनी विविध योजना कार्यान्वित कराव्यात. उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी माजी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. या मेळाव्यात १९६३ ते २०१२ पर्यंतच्या प्रत्येक बॅचमधील दोन विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, कोल्हापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अजित पवार, आदींसह राज्यभरातील सुमारे दीड हजार माजी विद्यार्थी उपस्थित होते. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष एम. डी. जांभळे यांनी प्रास्ताविकात ‘व्हिजन २०३०’चे नियोजन करण्याची सूचना केली. उपजिल्हाधिकारी संजय शिंदे व कॅप्टन उत्तम पाटील यांनी संघटनेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. 'आत्मा'च्या येथील प्रकल्प उपसंचालक भाग्यश्री पवार-फरांदे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
दोन वर्षांनी होणार ‘कृषी संगम’
दर दोन वर्षांनी ‘कृषी संगम’ घेण्याचे मेळाव्यात निश्चित झाले. संघटनेतर्फे महाविद्यालयातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना मदत करणे. महाविद्यालयाचा स्थापना दिन साजरा करणे.
संघटनेने कृषी क्षेत्रासह महाविद्यालयाच्या विकासासाठी ‘थिंक टँक’ म्हणून काम करणे. कृषी मेळावा घेणे. कृषी विषयक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे, आदी ठराव मेळाव्यात एकमताने हात उंचावून मंजूर करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या ऋणातून मुक्त व्हा
मेळाव्यात पुण्याच्या क्रीडा विभागाचे संचालक राजाराम माने यांनी दुष्काळग्रस्तांसाठी दहा हजार रुपयांचा निधी दिला; शिवाय माजी विद्यार्थ्यांनी आपल्यापरीने आर्थिक योगदान देऊन शेतकऱ्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचे आवाहन केले.