पगारी पुजारी कायद्याची पंधरा दिवसांत अंमलबजावणी व्हावी; अन्यथा कोल्हापूरात पुन्हा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 09:40 PM2018-06-08T21:40:47+5:302018-06-08T21:40:47+5:30
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचा कायदा होऊन तीन महिने झाले तरी शासनाने या कायद्याची अंमलबजावणी केलेली नाही. सध्या मंदिराच्या कामकाजामध्ये अधिनियमाविरुद्ध व्यवहार सुरू आहेत. तरी १२ एप्रिल रोजी लागू झालेल्या अधिनियमानुसार पुढील पंधरा दिवसांत पगारी पुजारी नेमावेत; अन्यथा आम्हाला पुन्हा पुजारी हटाव आंदोलन तीव्र करावे लागेल, असा इशारा श्री करवीर निवासिनी अंबाबाई पुजारी हटाव कृती समितीने दिला आहे.
याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्र शासन राजपत्र सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम २३५ हा १२ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाला; पण तीन महिने होत आले तरी कायदा राबविलेला नाही. श्री अंबाबाई देवीला ९ जून २०१७ रोजी घागरा-चोली परिधान करून देवीचा अवमान केलेल्या घटनेचा प्रसाद ठाणेकर यांना कोल्हापूरच्या जनतेने दिला आहे. दरम्यान, आम्हा भक्तांना जीवे मारण्याची धमकी निनावी पत्राद्वारे दिली गेली. त्याची चौकशी आजअखेर पोलिसांनी केलेली नाही.
संबंधित पत्रामध्ये धमकी देणाऱ्याने जय परशुराम असे शेवटी लिहिले होते; परंतु अंबाबाईच्या आशीर्वादाने आमचे जय परशुराम काही करू शकला नाही. तरी या सगळ््या बाबींची दखल घेऊन तातडीने कायद्याची अंमलबजावणी व्हावी. असे आवाहन दिलीप देसाई, डॉ. सुभाष देसाई, सचिन तोडकर, अशोक पोवार, चंद्रकांत पाटील, जयदीप शेळके, संदीप देसाई, अजित सासने, सुशील कोरडे, उदय लाड, विजय जाधव, नितीन सासने यांनी केले आहे.