‘संजय गांधी’ योजनेच्या पेन्शन वाढीची अंमलबजावणी करावी : प्रशासनाला निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 11:49 AM2019-07-09T11:49:58+5:302019-07-09T11:53:26+5:30
संजय गांधी निराधार पेन्शन योजनेंतर्गत निराधार महिला व श्रावणबाळ पेन्शन योजनेच्या मानधनात वाढ करून ते सरकारने ६०० रुपयांवरून १००० रुपये करण्याचे जाहीर केले आहे. त्याची अंमलबजावणी करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन संजय गांधी निराधार योजना समिती (कोल्हापूर उत्तर)तर्फे जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले.
कोल्हापूर : संजय गांधी निराधार पेन्शन योजनेंतर्गत निराधार महिला व श्रावणबाळ पेन्शन योजनेच्या मानधनात वाढ करून ते सरकारने ६०० रुपयांवरून १००० रुपये करण्याचे जाहीर केले आहे. त्याची अंमलबजावणी करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन संजय गांधी निराधार योजना समिती (कोल्हापूर उत्तर)तर्फे जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले.
समितीचे अध्यक्ष किशोर घाटगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार शीतल मुळे यांना निवेदन सादर केले. निवेदनातील मागण्या अशा, निराधार महिला व श्रावणबाळ पेन्शन योजनेंतर्गत एक अपत्य असल्यास ११०० रुपये, दोन अपत्ये अवलंबित असल्यास निराधार महिलांना १२०० रुपये अनुदान देण्याचे सरकारने जाहीर केले असून, त्याची लवकर अंमलबजावणी करावी.
शासनाने ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६० वर्षे केली असून, श्रावणबाळ योजनेसाठी शासनाने ही वयोमर्यादा लागू करावी. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना यासाठी राष्ट्रीय अपंग पेन्शन योजनेप्रमाणे उत्पन्नाची मर्यादा ५० हजार रुपये इतकी करावी.
शिष्टमंडळात सागर घोरपडे, अशोक लोहार, शुभांगी भोसले, पूजा भोर, तेजस्विनी पाटील, दिग्विजय कालेकर, आदींचा समावेश होता.