‘झीरो पेंडन्सी’चे काम होणार आॅनलाइन महिन्याभरात अंमलबजावणी : प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापूरमध्ये काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 09:21 PM2018-01-20T21:21:53+5:302018-01-20T21:22:14+5:30
कोल्हापूर : महसूलसह इतर शासकीय विभागांतील झीरो पेंडन्सीचे कामकाज आता ‘आॅनलाइन’ होणार आहे. ‘झीरो पेंडन्सी अॅण्ड डेली डिस्पोजल’ या प्रणालीद्वारे प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापूर जिल्ह्यात महसूल व जिल्हा परिषद विभागात काम सुरू
प्रवीण देसाई ।
कोल्हापूर : महसूलसह इतर शासकीय विभागांतील झीरो पेंडन्सीचे कामकाज आता ‘आॅनलाइन’ होणार आहे. ‘झीरो पेंडन्सी अॅण्ड डेली डिस्पोजल’ या प्रणालीद्वारे प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापूर जिल्ह्यात महसूल व जिल्हा परिषद विभागात काम सुरू करण्यात आले आहे. महिन्याभरात राज्यभरात महसूलसह सर्व जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका व इतर शासकीय कार्यालयांमध्ये हे काम सुरू होण्याची शक्यता आहे.
राष्टÑीय सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी)च्या कोल्हापूर विभागातर्फे ‘झीरो पेंडन्सी अॅण्ड डेली डिस्पोजल’ या प्रणालीचे काम सुरू आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी महसूल विभागात झीरो पेंडन्सीचा उपक्रम राबविला आहे. सुरुवातीला पुणे विभागापुरता मर्यादित असणारा हा उपक्रम राज्यभरात महसूल विभागात स्वीकारण्यात आला. पोलीस प्रशासनातही याची अंमलबजावणी करण्यात आली. झीरो पेंडन्सीचे मॅन्युअली केले जाणारे काम आता आॅनलाइन प्रणालीद्वारे केले जात आहे.
शासकीय कामांमध्ये झीरो पेंडन्सीसाठी प्रायोगिक तत्त्वावर पुणे विभागात आॅनलाइन प्रणाली विकसित केली जात आहे. त्याचे काम प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापूर जिल्ह्यात सुरू आहे. आॅनलाइनद्वारे झीरो पेंडन्सीची ही संकल्पना मुख्यमंत्र्यांना आवडली आहे. या प्रणालीची राज्यातील सर्वच शासकीय विभागांमध्ये अंमलबजावणी केली जाईल, अशी घोषणा त्यांनी नुकतीच केली आहे. त्यानुसार लवकरच त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
- चंद्रकांत दळवी,
विभागीय आयुक्त, पुणे
‘ई डिस्निक’ प्रणालीमध्ये काही नवे बदल करून ‘झीरो पेंडन्सी अॅण्ड डेली डिस्पोजल’ ही नवीन वेबसाईट तयार करण्याचे काम सुरू आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापूरमध्ये महसूल व जिल्हा परिषदेमध्ये झीरो पेंडन्सीचे काम सुरू असून, महिन्याभरात संपूर्ण राज्यात याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
- चंद्रकांत मुगळी,
जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी, राष्टÑीय सूचना विज्ञान केंद्र, कोल्हापूर