क्रीडा विकासासाठी महत्त्वाचा प्रयोग--मधुरिमाराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 12:43 AM2019-03-07T00:43:25+5:302019-03-07T00:43:59+5:30
खेळाडूला शारीरिक व मानसिक, तांत्रिक बाबींची परिपूर्ण माहिती देणारी ही कार्यशाळा कोल्हापूर नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच होत आहे. खेळाच्या वाढीसाठी ही कार्यशाळा म्हणजे महत्त्वाचा प्रयोग ठरणार
कोल्हापूर : खेळाडूला शारीरिक व मानसिक, तांत्रिक बाबींची परिपूर्ण माहिती देणारी ही कार्यशाळा कोल्हापूर नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच होत आहे. खेळाच्या वाढीसाठी ही कार्यशाळा म्हणजे महत्त्वाचा प्रयोग ठरणार आहे, असे मत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या महिला समिती अध्यक्षा मधुरिमाराजे यांनी व्यक्त केले.
न्यू कॉलेज व कोल्हापूर स्पोर्टस डेव्हलपमेंट अॅँड रिसर्च फौंडेशनतर्फे हॉटेल सयाजी येथे बुधवारी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे होते.
मधुरिमाराजे म्हणाल्या, नव्याने खेळांमध्ये करिअर करणाऱ्या युवकांना अशा प्रकारच्या कार्यशाळांमुळे बळ मिळेल. खेळाच्या वाढीसाठी हा महत्त्वाचा प्रयोग ठरणार आहे. कार्यशाळेत सहभागी होऊन स्वत:ला अधिक सामर्थ्यवान बनवावे. यात मोबाईल अॅपचाही वापर करावा. अशा कार्यशाळा खेळाडूंमध्ये जनजागृती निर्माण करतात. त्यामुळे त्याचा फायदा सहभागी होणाऱ्यांना निश्चितच होईल.
पहिल्या सत्रात प्रसिद्ध स्पोर्ट फिजिओथेरपिस्ट डॉ. संदीप चौधरी यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, अनेकजण व्यायामाची पुरेशी माहिती न घेता व्यायाम करतात. हा व्यायाम शरीराला फायदेशीर होण्यापेक्षा घातक ठरतो. त्यामुळे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करणे गरजेचे आहे. प्रत्येक अवयवानुसार व्यायामप्रकार ठरलेला असतो. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार प्रथम शरीर गरम (वॉर्मअप) करावे व त्यातून हलका घाम आला पाहिजे. लवचिकता (स्ट्रेचिंग) महत्त्वाची असते. घाईगडबडीत व्यायाम केल्यास त्यातून गंभीर इजा पोहोचू शकते. हे टाळण्यासाठी आवश्यक ती साधने, योग्य प्रशिक्षक यांची निवड करणे गरजेचे आहे.
खेळातील मानसशास्त्र यावर क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ डॉ. करणबीर सिंग म्हणाले, शरीराबरोबर मनाचेही आरोग्य महत्त्वाचे असते. खेळाडूला शारीरिक क्षमतेबरोबर मानसिक क्षमताही तितक्याच वाढवाव्या लागतात. कसोटीच्या क्षणी धैर्य, आत्मविश्वास व खेळाडूचे मनोबल वाढविण्यात मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो. मानसशास्त्र यश मिळविण्यासाठी मानसिकदृष्ट्या सुदृढ बनविते.
कार्यशाळेत प्रशिक्षणाच्या पद्धती यावर डॉ. हरीश पंदजरेथील व खेळातील ‘बॉयोमॅकनिक्स’वर डॉ. अजय चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. धावपटू गौरेश पोवार याने खेळातील संधी व परदेशातील क्रीडाशिक्षण याबद्दल मार्गदर्शन केले. यात १३ क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींसह खेळाडू, प्रशिक्षक, मार्गदर्शक असे १५० हून अधिक जण सहभागी झाले होते. यावेळी प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके, अर्जुन पुरस्कार विजेत्या टेबल टेनिसपटू शैलजा साळोखे, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. अमर सासने यांनी आभार मानले. कार्यशाळा संयोजनात प्रा. प्रकुल मांगोरे-पाटील, दिग्विजय मळगे, डॉ. शरद बनसोडे, सुभाष पवार, आदींनी परिश्रम
घेतले.