विक्री केंद्रांना समज : खतविक्रीची तपासणी; पश्चिम पन्हाळा विभागात कृषी विभागाचे छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 12:18 PM2020-05-05T12:18:46+5:302020-05-05T12:20:35+5:30
काही खत दुकानात खते उपलब्ध असून, युरियाची आवश्यकता भासत असल्याने शेतकरी खत दुकानात जाऊन युरियाबाबत विचारणा करीत आहेत. मात्र युरिया उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.
कोल्हापूर : पश्चिम पन्हाळा परिसरातील काही कृषी केंद्रातून शेतकऱ्यांना चढ्या दराने खत विक्री होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर पन्हाळा तालुका कृषी विभागाने त्या परिसरातील खत विक्रेत्यांवर छापे टाकले. त्यामध्ये कृषी सेवा केंद्रातील व्यवहार, खतसाठा, विक्री रजिस्टर, बिलबुकाची प्रत्यक्ष पहाणी केली. रजिस्टर व बिलामध्ये तफावत आढळली असून त्यांना कडक शब्दांत समज देण्यात देण्यात आली.
कोतोली, बाजारभोगाव, पुनाळ, कळे, काटेभोगाव, पोर्ले, किसरुळ, पुशिर, आसगाव, मरळी, परखंदळे, आंबर्डे या गावातील दुकानदारांवर हे छापे टाकण्यात आले. काही खत दुकानात खते उपलब्ध असून, युरियाची आवश्यकता भासत असल्याने शेतकरी खत दुकानात जाऊन युरियाबाबत विचारणा करीत आहेत. मात्र युरिया उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. युरिया हवा असेल तर इतर खतेही खरेदी करा तरच युरिया देतो अशा तक्रारी होत्या.
बाजारभावापेक्षा अधिक दराने खत विक्री केली जात आहे. पिकाला खताची मात्रा देण्याशिवाय पर्याय नसलेले शेतकऱ्यांना वाढीव दराने युरिया खरेदी करण्याची वेळ आली आहे. तालुका गुणनियंत्रण निरीक्षक गौरी जंगम, तालुका कृषी अधिकारी डॉ. रामचंद्र धायगुडे, गुणनियंत्रक शेळके, विभागीय कृषी साहाय्यक अमृत मडके, मधुकर कुंभार, उदय पाटील, सुतार यांच्या भरारी पथकाने हे छापे टाकले.
जादा दराने युरिया विक्री करणे, साठेबाजी करणे, एका खतासाठी नको असलेले खत शेतकºयाच्या माथी मारणे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. ज्यांच्या दुकान तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्या आहेत त्यांच्यावर चौकशी अंती कारवाई करु
डॉ. रामचंद्र धायगुडे तालुका कृषी अधिकारी