जिल्ह्यातील दारू हातभट्ट्यांवर छापासत्र, अवैध दारू विक्रेते, हातभट्टीचालकांचे धाबे दणाणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:59 AM2019-09-25T11:59:05+5:302019-09-25T12:00:47+5:30
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरासह उपनगर व ग्रामीण भागांत गावठी दारूनिर्मिती करणाऱ्या हातभट्ट्या व बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर ...
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरासह उपनगर व ग्रामीण भागांत गावठी दारूनिर्मिती करणाऱ्या हातभट्ट्या व बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर सामूहिक छापे टाकून कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मंगळवारी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील ३१ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्याचे नियोजन केले आहे.
जिल्ह्यात गावठी दारूनिर्मिती करणाऱ्या हातभट्ट्या व दारू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईसत्र सुरू केले आहे; त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क आणि हद्दीतील पोलीस ठाणे यांनी कारवाईचा आराखडा आखला आहे. या मोहिमेत १५ निरीक्षक, २२ सहायक पोलीस निरीक्षक, १४० पोलीस कर्मचारी, पाच स्ट्रायकिंग फोर्स सहभागी केले आहेत. या संपूर्ण कारवाईचा आढावा पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख घेणार आहेत. कारवाई करण्याचा संदेश नियंत्रण विभागातून सर्व पोलीस ठाण्यांना दिला गेला आहे.
या ठिकाणी आहेत दारू अड्डे
भुदरगड तालुक्यामध्ये जकिनपेठ, देवकेवाडी, बोंगार्डेवाडी; राधानगरीमध्ये म्हासुर्ली, गवशी, पाटीलवाडी, हातकणंगले माणगाववाडी, आजरा, बहिरेवाडी; करवीरमध्ये म्हालसवडे, कणेरीवाडी, सरनोबतवाडी, मोरेवाडी, राजेंद्रनगर, मोतीनगर, शिंगणापूर.
मोरेवाडीतील हातभट्टी उद्ध्वस्त
मोरेवाडी, मोतीनगर परिसरातील हातभट्ट्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग व राजारामपुरी पोलिसांनी मंगळवारी सकाळी छापे टाकून सात घरांतील तयार दारू, कच्चे रसायन, नवसागर असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. सात सिंटेक्स टाक्या, १५ बॅरेल, चार अॅल्युमिनिअम डबे, रबरी पाईप असा साठा नष्ट केला. राज्यशासनाचा महसूल चुकविण्यासाठी मोरेवाडीत मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टीची दारू तयार केली जाते. कारवाई कितीवेळा केली तरी पुन्हा या ठिकाणी भट्ट्या पेटल्या जातात.
शहापूर, इचलकरंजी देशी दारू साठ्यांवर छापा, एकास अटक, एक पसार
शहापूर आर. के. नगर इचलकरंजी येथे देशी दारूच्या साठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी छापा टाकून एकाला अटक केली. संशयित उत्तम शामराव पाटील (वय ३५, रा. सौंदलगा, जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून ५३ हजार किमतीचे देशी दारूचे १४ बॉक्स जप्त केले. संशयित रवी मिणेकर हा पसार झाला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध दारू अड्ड्यांवर छापासत्र सुरू आहे. शहापूर इचलकरंजी येथे संशयित उत्तम पाटील व रवी मिणेकर यांच्याकडे देशी दारूचा साठा असल्याची माहिती हातकणंगलेचे भरारी पथकाचे निरीक्षक जयसिंग जाधव यांना मिळाली. त्यांनी पथकासह छापा टाकून ही कारवाई केली.