प्रभावळी, रांगोळी, चरित्रातून शाहू विचारांचा जागर
By admin | Published: June 24, 2015 12:39 AM2015-06-24T00:39:12+5:302015-06-24T00:43:24+5:30
राजर्षी शाहू जयंतीचे औचित्य : अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे प्रदर्शनाचे आयोजन
कोल्हापूर : रयतेच्या कल्याणाचे, सामाजिक परिवर्तनाचे कार्य केलेले लोकराजा राजर्षी शाहू महाराजांवर प्रभाव पडलेल्या व्यक्ती आणि शाहूंच्या प्रेरणेने पुढे कार्यरत असलेल्या व्यक्तिचरित्राच्या व रांगोळीच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून शाहूंच्या विचारांचा जागर मांडण्यात आला आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शाहू स्मारक भवनच्या कलादालनात आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे, ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, बबनराव रानगे, महेश मछले, डॉ. संदीप पाटील, पंचायत समितीचे सदस्य राजू सूर्यवंशी उपस्थित होते. या प्रदर्शनात रंगावलीकार बाबासो कांबळे यांनी राजर्षी शाहू महाराजांची हुबेहूब रांगोळी काढली आहे; तर प्रभावळी व शाहूंच्या जीवनचरित्राची माहिती ‘राजर्षी शाहू छत्रपती’ या लेखक इंद्रजित सावंत व देविकाराणी पाटील यांच्या ग्रंथातून घेण्यात आली आहे.
यावेळी विवेक आगवणे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवणारा अखिल भारतीय मराठा महासंघदेखील महाराजांच्या प्रभावळीतीलच एक आहे. डॉ. जयसिंगराव पवार यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी रंगावलीकार बाबासो कांबळे व ६८ व्या वर्षी अंधत्व आल्यानंतर त्या अंधत्वावर मात करीत छत्रपती शिवराय व राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावर काव्य करून त्यांची भक्ती जपणारे हारुणभाई हमीदसो मणेर यांचा सत्कार झाला. प्रास्ताविकात महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी शिवाजी महाराज व शाहू महाराजांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणे हेच संघाचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. मनोज नरके यांनी आभार मानले. यावेळी शैलजा भोसले, राजू परांडेकर, शशिकांत पाटील, प्रकाश पाटील, दीपक मिसाळ, पवन निपाणीकर, अवधूत पाटील, संजय कांबळे आदी उपस्थित होते.
काय आहे प्रदर्शनात...
शाहू महाराजांचे कनिष्ठ बंधू बापूसाहेब घाटगे यांच्यासह भवानी मंडपाबाहेरील रस्त्याला भाऊसिंगजी रोड हे नाव मिळाले ते भावसिंहजी महाराज, माधवराव शिंदे, बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड, राजगुरू रघुपती पंडित महाराज, कर्नल मेरी वेदर, गार्डियर सर स्टुअर्ट फ्रेजर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, विठ्ठल रामजी शिंदे, भास्करराव जाधव, रघुनाथराव सबनीस, अण्णासाहेब लठ्ठे, दिवाण शेख महंमद युसूफ अब्दुला, कृष्णाजी केळुसकर, ज्यांच्या नावे आज पापाची तिकटी परिसर आहे ते पापा परदेशी, बाबा गजबर, आबालाल रेहमान, दत्तोबा दळवी, अल्लादिया खाँ, केशवराव भोसले, बालगंधर्व, केसरबाई केरकर, शाहीर लहरी हैदर, कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्यासह विविध व्यक्तींचा परिचय मांडण्यात आला आहे. याशिवाय राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मापासून ते त्यांनी संस्थानचे राजे म्हणून घेतलेले निर्णय, विकासकामे, त्यांच्या आयुष्यात आलेले सुखद व दु:खद प्रसंग, शाहू महाराजांच्या अखेरच्या काळात त्यांची अवस्था आणि निधन हा सगळा प्रवास लिखित स्वरूपात दिला आहे.