अन्नसुरक्षेसाठी शेतीव्यवस्था सुधारावी
By admin | Published: January 6, 2015 12:37 AM2015-01-06T00:37:03+5:302015-01-06T00:50:52+5:30
यशवंतराव थोरात : यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ रुरल डेव्हलपमेंटतर्फे व्याख्यान
कोल्हापूर : देशातील दारिद्र्य, भूकबळी असे प्रश्न सोडविण्यासाठी अन्नसुरक्षेशिवाय पर्याय नाही. अन्नसुरक्षेची अंमलबजावणी करावयाची असेल, तर शेतीव्यवस्था पहिल्यांदा सुधारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांनी आज, सोमवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ रुरल डेव्हलपमेंटतर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘अन्नसुरक्षेतील समस्या : उपभोग किंवा नाश होणे’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. मानव्यशास्त्र सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, तर स्कूलचे संचालक डॉ. वसंत जुगळे प्रमुख उपस्थित होते.
डॉ. थोरात म्हणाले, अन्नसुरक्षेची अंमलबजावणी केल्यास देशातील दारिद्र्य, भूकबळी असे प्रश्न निश्चितपणे सोडविता येतील. अन्नाला शेतीशिवाय पर्याय नसल्याने उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतीव्यवस्था सुधारणे गरजेचे आहे. शिवाय नागरिकांनी शाकाहार घेणे, पाण्याचा मर्यादित आणि गरजेनुसार वापर करणे तितकेच महत्त्वाचे आहे. भरडधान्याचे उत्पादन म्हणजे शेती नव्हे. जीवनसत्त्वयुक्त अन्नधान्यांचे उत्पादन म्हणजे खऱ्या अर्थाने शेती आहे. बदलती ‘फूड हॅबिट’ हे देशासमोरील मोठे आव्हान बनले आहे. फळे आणि मांसाहाराकडे लोक मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. त्यातून प्रदूषणवाढीला हातभार लागत आहे. प्रदूषण टाळण्यासह अन्नसुरक्षेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निसर्गास अनुकूल शेती करण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने सध्याच्या युवकांनी कार्यरत व्हावे.
डॉ. भोईटे म्हणाले, गेल्या काही वर्षांतील हवामानाची स्थिती पाहता दुष्काळाच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. वर्षागणिक त्यात भर पडत आहे. यापुढे दुष्काळाची परिस्थिती अधिक गडद होईल असे वाटते. अशा स्थितीत टिकून राहणे, तिला सामोरे जाण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती, पाणी, आदींचा योग्य पद्धतीने वापर करणे उपयुक्त ठरणारे आहे. कार्यक्रमात वैशाली भोसले यांनी स्वागत केले. कविता वडाळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)