सुधारित घेणे ....मराठा आरक्षणासाठी दिल्लीला धडक द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:25 AM2021-03-16T04:25:47+5:302021-03-16T04:25:47+5:30
कोल्हापूर : मराठा आरक्षणप्रश्नी राजधानी दिल्लीला धडक दिल्याशिवाय मराठ्यांपुढे पर्याय राहिलेला नाही. तरच हा प्रश्न मार्गी लागेल. त्याकरिता सक्षम ...
कोल्हापूर : मराठा आरक्षणप्रश्नी राजधानी दिल्लीला धडक दिल्याशिवाय मराठ्यांपुढे पर्याय राहिलेला नाही. तरच हा प्रश्न मार्गी लागेल. त्याकरिता सक्षम नेतृत्व हवे. ते नेतृत्व करण्यासाठी छत्रपती घराण्यातील शाहू छत्रपती यांना साकडे घाला, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय संयुक्त चिटणीस दिलीपसिंह जगताप यांनी केले. राजर्षी शाहू स्मारक भवनात सोमवारी महासंघाच्या कोल्हापूरसह सांगली, सातारा क्षेत्रातील मोजक्या पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.
जगताप म्हणाले, मराठा आरक्षणात काही ओबीसी नेते विरोध करीत आहेत. हा प्रश्न आता राज्याकडे राहिलेला नाही. त्याची सोडवणूक करायची असेल तर दिल्लीला धडक दिली पाहिजे. त्याकरिता साडेतीन कोटी मराठ्यांपैकी तीन कोटी छत्रपतींचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर मागे राहतील, असा विश्वासही जगताप यांनी व्यक्त केला. दहा वर्षे शिक्षक भरती नाही. अनेकांच्या हाताला कोरोनामुळे काम नाही. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांना अंगावर घ्या, तरच आजची पिढी तुमच्याबरोबर येईल. महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणााले, मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावे लागणार आहे. त्यासाठी समाजाने पुन्हा एकदा ताकद दाखविण्याची वेळ आली आहे. स्वागत नूतन जिल्हा अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी, तर प्रास्ताविक मारुती मोरे यांनी केले.
यावेळी राज्य कार्यालयीन सचिव प्रमोद जाधव, माजी अध्यक्ष नेताजीमामा सूर्यवंशी, महिला आघाडीप्रमुख शैलजा भोसले, सांगली जिल्हा प्रभारी अध्यक्ष अभिजित शिंदे, माजी नगरसेवक धनंजय सावंत, दिलीप सावंत, दिलीप देसाई, आदी मान्यवर उपस्थित होते.
जगताप यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
- मराठा आरक्षणासााठी किमान ५० आमदार विधानसभेत पाठवावे लागतील. त्याकरिता महासंघाने राजकीय पक्षाची स्थापना करावी.
- करोडोचे मोर्चे काढून काय साध्य झाले ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
- कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. आज जर ही पिढी सुरक्षित करायची असेल तर सक्षम नेतृत्व हवे. शाहू छत्रपतींच्या रूपाने ते मिळेल. त्याकरिता महाराजांना साकडे घालावेत.
- क्रांती मोर्चात शंभर आमदार आपल्या पाठीशी होते. त्यांनाच पुढे केले असते, तर आज हा प्रश्न मार्गी लागला असता.
फोटो : १५०३२०२१-कोल-मराठा महासंघ , ०१
ओळी : कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात सोमवारी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या तीन जिल्ह्यांच्या पदाधिकारी बैठकीत महासंघाचे राष्ट्रीय संयुक्त चिटणीस दिलीपसिंह जगताप यांनी मार्गदर्शन केले. यावेळी धनंजय सावंत, मारुती मोरे, शेलाजीमामा सूर्यवंशी, वसंतराव मुळीक, प्रमोद जाधव, शैलजा भोसले, अभिजित सृर्यवंशी उपस्थित होते.
(छाया : नसीर अत्तार)