शांतीसागर महाराजांची जीवनशैली आत्मसात करा
By admin | Published: June 13, 2017 01:04 AM2017-06-13T01:04:40+5:302017-06-13T01:04:40+5:30
कुन्थुसागर महाराज : कुन्थुगिरी येथे जन्मोत्सव जयंती सोहळा
लोकमत न्यूज नेटवर्क --आळते : सत्य, अहिंसा आणि शांतीचा संदेश पूर्वकालापासून मुनिसंघाने मानवजातीला दिला आहे. त्यामुळे जैन धर्म हा श्रेष्ठ धर्म आहे. आचार्य शांतीसागर महाराजांची आचार, विचार व जीवनशैली आत्मसात केल्यास मानवी जीवन समृद्ध होईल, असा संदेश गणाधिपती गणाधराचार्य श्री कुन्थुसागर महाराज यांनी दिला.
आळते (ता. हातकणंगले) येथील कुन्थुगिरी येथे जन्मोत्सव जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
गणाधिपती गणधराचार्य श्री कुन्थुसागर महाराज यांच्या ७१ व्या जन्मदिनानिमित्त दि. ८ जून ते ११ जून या चार दिवसांमध्ये कुंन्थुगिरी धर्म क्षेत्रावरती विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये ध्वजारोहण, महामस्तकाभिषेक, आरती, आराधन, दीपोत्सव, संगीत संध्या, गुरुपूजा असे विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी धार्मिक प्रवचनामध्ये आचार्य वैराग नंदी, आचार्य निश्चय सागरजी महाराज, आचार्य सुविधी सागरजी महाराज यांचे प्रवचन झाले. मानव जातीच्या कल्याणासाठी जैन धर्मातील सर्व साधूसंतांनी एकत्र येऊन जैन समाज एकसंध ठेवण्याचे काम भविष्यात केले पाहिजे, असा प्रवचनाचा सूर होता. गणाधिपती ऋणधराचार्य कुन्थुसागरजी महाराज यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने
१०८ भक्तगणांनी रक्तदान केले. औरंगाबादचे महाजार भक्त संतोषजी पाटणी यांनी चार दिवस येणाऱ्या हजारो भाविकांच्या भोजनाची व्यवस्था केली होती.
कार्यक्रमासाठी माजी खासदार कल्लापाण्णा आवाडे, आमदार सुजित मिणचेकर, पोलीस अधिकारी सतीश माने, जि. प. सदस्य अरुण इंगवले, सुभाष शेट्टी, माजी जि. प. अध्यक्ष नानासो गाठ, जि. प. सदस्या पद्माराणी पाटील, वंदना मगदूम, सुधाकर मणेर, संजय चौगुले, सुरेश मोघे, सुधीर पाटील, जयूदीदी, पूनम दीदी, दीपक पाटील, प्रमोद जनगोंडा, प्रमोद हावळे, शीतल बुरशे , मान्यवर उपस्थित होते.
आळते (ता. हातकणंगले) येथील श्री क्षेत्र कुन्थुगिरी येथे जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गणाधिपती गणधराचार्य श्री कुन्थुसागरजी महाराज यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अन्य मान्यवर उपस्थित होते.