कार्यपद्धतीत सुधारणा करा; अन्यथा गंभीर समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:27 AM2021-08-24T04:27:39+5:302021-08-24T04:27:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : पालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही पेन्शनची रक्कम मिळत नसल्याने सेवानिवृत्त कर्मचारी सूरज ठिकणे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : पालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही पेन्शनची रक्कम मिळत नसल्याने सेवानिवृत्त कर्मचारी सूरज ठिकणे यांनी नगराध्यक्षा अलका स्वामी यांची भेट घेतली. सेवानिवृत्त होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरीही रक्कम मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी नजरचुकीने नाव राहिल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कार्यपद्धतीत सुधारणा करा, अन्यथा गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल, असा सज्जड दम मुख्याधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांसमोरच लेखापालांना दिला, तसेच कामात सुधारणा न झाल्यास निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा इशाराही दिला.
या प्रकारामुळे पालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. पालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना राखीव निधीतून रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, ठिकणे यांना पेन्शनसह चार लाख ३५ हजार रुपये अद्याप मिळाले नाहीत. याबाबत त्यांनी प्रशासनाकडे विचारणा केली असता जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविलेल्या यादीत नजरचुकीने नाव राहिल्याचे कबूल केले. याबाबत अलका स्वामी यांनी लेखापाल कलावती मिसाळ यांच्याशी चर्चा केली. यावेळी समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांना नगराध्यक्षांनी पाचारण केले. कार्यपद्धतीत सुधारणा न केल्यास पालिकेला गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत असल्याबाबतची नाराजी लेखापालांना उद्देशून केली. सेवानिवृत्तांची यादी तयार करीत असताना नाव राहिलेच कसे आणि ज्यांना देय रक्कम दिली आहे, त्यांची नावे यादीत आलीच कशी, असा सवालही उपस्थित केला. मिसाळ यांनी नजरचुकीने नाव राहिल्याचे मान्य केले. ठिकणे यांनी धनादेश रजिस्टरवर खाडाखोड करणे फौजदारी गुन्हा असल्याचे मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. प्रशासनाच्या या चुकीची शिक्षा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सोसावी लागत असून, त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लेखापालांच्या चुकीमुळे रक्कम मिळाली नसून ती नगराध्यक्षा किंवा लेखापाल यांनी द्यावी, अशी मागणी ठिकणे यांनी केली. यावेळी कर्मचाऱ्यांना प्राधान्याने देय रकमा देण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांना केल्या.