(सुधारीत )ऐनवेळच्या पावसाने जागवली रात्र, दुपारी उडवली तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:15 AM2021-02-19T04:15:12+5:302021-02-19T04:15:12+5:30
कोल्हापूर : ओडिशाच्या किनारपट्टीवर चक्रीवादळसदृश हवेच्या दाबाचे क्षेत्र तयार झाल्याचा परिणाम होऊन निरभ्र आभाळ आणि कोरडे हवामान असतानाही बुधवारच्या ...
कोल्हापूर : ओडिशाच्या किनारपट्टीवर चक्रीवादळसदृश हवेच्या दाबाचे क्षेत्र तयार झाल्याचा परिणाम होऊन निरभ्र आभाळ आणि कोरडे हवामान असतानाही बुधवारच्या रात्री अचानक पावसाने एन्ट्री केली. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या लखलखाटासह आलेल्या या पावसाने संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत टप्प्याटप्याने हजेरी लावत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. गुरुवारी दुपारनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावत सर्वांचीच तारांबळ उडवली.
हवामान खात्याने १७ ते १८ रोजी विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तविला होता. तो बुधवारी कोल्हापुरात तंतोतंत खरा ठरला. सोमवारपासून जिल्ह्यात दाट धुके पडत आहे. दवही जास्त असल्याने पहाटे झाडावरून पाण्याचे थेंबही पडत आहेत. सकाळी गारवा आणि दिवसभर कडक उन्हाचे चटकेही बसत आहेत. बुधवारी सकाळीही असेच धुके होते, त्यानंतर कडक ऊन पडले. दुपारी दोननंतर मात्र वातावरण अचानक ढगाळ झाले. गार वारेही जोरात वाहू लागले. संध्याकाळी गडहिंग्लज, आजरा परिसरात पावसाने हजेरीही लावली. रात्री दहानंतर पुन्हा विजांचा कडकडाट सुरू झाला आणि पावसाला सुरुवात झाली. कोल्हापूर शहर परिसरात दीडच्या सुमारास पावसास सुरुवात झाली. जवळपास तासभर पाऊस पडत होता. दरम्यान, गुरुवारीही पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. सकाळी ढगाळ वातावरण दिसत होते. दहानंतर ते निवळले, गारवा कमी होऊन उष्माही वाढला, पण दुपारी दोननंतर पुन्हा आभाळ भरुन आले आणि पावसाने ढगांच्या गडगडाटासह हजेरी लावली. पावसाचा जोर मध्यरात्रीपर्यंत राहील आणि त्यानंतर शुक्रवारी वातावरण पूणपणे निवळेल, असा हवामान खात्याने सांगितले आहे.
चौकट ०१
पावसाचा फटका पिकांना
ऐनवेळेला आलेल्या पावसाने मात्र सर्वांचीच तारांबळ उडवली. रात्रीच पाऊस सुरू झाल्याने गुऱ्हाळासाठी वाळवलेले जळणही भिजले. पावसाचा फारसा जोर नसल्याने उसाच्या तोडीवर परिणाम झाला नाही. या पावसाने फळ पिकांना मात्र फटका बसला आहे. अजूनही आंब्याला मोहोर येण्याची, कैऱ्या धरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या विचित्र हवामानामुळे ते गळून पडणार आहे. फणस, काजूचीही गळ वाढणार आहे. सध्या भुईमूग फुलोऱ्यात, तर कुठे उगवणीनंतर वाढीच्या अवस्थेत आहे. धुके व पावसामुळे त्यावर तांबेरा, करप्याचा प्रसार वाढण्याची शक्यता असल्याने आता फवारणीसाठी खर्च करावा लागणार आहे.