सुधारित : महाडिक वसाहतीत ‘ताराराणी’चे विरोधकांना कडवे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:43 AM2021-02-06T04:43:47+5:302021-02-06T04:43:47+5:30

विनोद सावंत / लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू अशी वस्ती असणारा महाडिक वसाहत, पाटोळेवाडी प्रभाग क्रमांक ...

Improved: Bitter challenge to opponents of 'Tararani' in Mahadik colony | सुधारित : महाडिक वसाहतीत ‘ताराराणी’चे विरोधकांना कडवे आव्हान

सुधारित : महाडिक वसाहतीत ‘ताराराणी’चे विरोधकांना कडवे आव्हान

Next

विनोद सावंत / लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू अशी वस्ती असणारा महाडिक वसाहत, पाटोळेवाडी प्रभाग क्रमांक १८ हा प्रभाग आहे. केलेल्या विकासकामांच्या जोरावर ताराराणी आघाडी निवडणुकीत उतरणार आहे. त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेकडून फिल्डिंग लावली जात आहे. सध्या हा प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग झाला असून, अनेकांची संधी हुकली आहे. पाच ते सहा इच्छुकांची चर्चा सुरू आहे. यामधील काहींनी गाठीभेटीवर भर दिला आहे.

कोल्हापूर शहरात तावडे हॉटेलमार्गे शहरात प्रवेश केल्यानंतर जे काही पहिले प्रभाग लागतात, त्यापैकी प्रभाग क्रमांक १८ महाडिक वसाहत एक आहे. यापूर्वी हा प्रभाग महाडिक वसाहत नावाने होता. हरकतीनंतर यामध्ये बदल झाला असून, महाडिक वसाहत, पाटोळेवाडी असे प्रभागाचे नाव झाले आहे. या प्रभागातून राष्ट्रवादीचे नारायण बुधले, प्रकाश पाटील यांनी प्रतिनिधित्व केले आहे. महापालिकेच्या गत निवडणुकीत हा प्रभाग सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित होता. यावेळी काँग्रेस आणि ताराराणी आघाडीमध्ये थेट सामना झाला. यामध्ये ताराराणी आघाडीच्या सीमा कदम यांनी बाजी मारली. काँग्रेसच्या शीतल देसाई यांनी ११६४ इतकी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली. शिवसेना आणि राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला.

सीमा कदम या माजी महापौर शिवाजीराव कदम यांच्या स्नुषा आणि ताराराणी आघाडीचे महापालिकेतील गटनेते सत्यजित कदम यांच्या वहिनी आहेत. प्रभागात त्यांनी संपर्क चांगला ठेवला असून, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांची नेहमी धडपड असते. विरोधी आघाडीत असतानाही प्रभागाचा विकास साधता येतो, हे त्यांनी कामातून दाखवून दिले आहे. महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत हा प्रभाग नागरिकांचा मागास वर्ग झाला आहे. त्यामुळे सीमा कदम निवडणूक लढवणार नाहीत. ताराराणी आघाडीच्या उमेदवाराचा त्या प्रचार करणार आहेत. मागील निवडणुकीत कदम यांच्याविरोधात असणाऱ्या शीतल देसाई यांचे पती प्रमोद देसाई या निवडणुकीत ताराराणी आघाडीकडून इच्छुक आहेत. त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. ते आणि त्यांच्या पत्नी शीतल यांनी या प्रभागातून आतापर्यंत चार निवडणुका लढल्या असून, तीन वेळा दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. पराभूत झाल्यानंतर खचून न जाता त्यांनी कामे सुरूच ठेवली आहेत. प्रमोद देसाई गेल्या १५ वर्षांपासून सामाजिक कामात आहेत. दत्तमंदिरचे संचालक असून, त्यांचा प्रभागात चांगला संपर्क आहे.

प्रभाग क्रमांक १९ मुक्त सैनिक वसाहत अनुसूचित महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने तेथील ताराराणी आघाडीचे विद्यमान नगरसेवक राजसिंह शेळके यांच्याही नावाची चर्चा या प्रभागात सुरू आहे. त्यांच्यासह माजी नगरसेवक नारायण बुधले यांचे चिरंजीव सचिन बुधले यांच्या नावाची चर्चा आहे. देसाई ताराराणी आघाडीकडे गेल्याने काँग्रेस ऐनवेळी येथून माजी नगरसेवक तौफिक मुलाणी यांना रिंगणात उतरविण्याची शक्यता आहे. त्यांच्यासह नितीन मिसाळ, दिलीप बेळगावकर किंवा राम बेळगावकर यांच्या नावाचीही चर्चा आहे.

चौकट

पाच वर्षांत झालेली विकासकामे

रुईकर कॉलनी मैदानात स्केटिंग ट्रॅक, एलईडी पोल, पाथवे

विद्या कॉलनीत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र

छत्रपती संभाजी महाराज स्मारक सुशोभीकरण

युनिक पार्क येथील चॅनेल

रुईकर कॉलनी स्वामी समर्थ मंदिर रोड काँक्रिटीकरण

घाटगे कॉलनीत ऑक्सिजन पार्क, हॉलची उभारणी

लांबोरी हॉस्पिटल परिसरातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण

प्रतिक्रिया

प्रभागाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. विरोधी पक्षात असतानाही सुमारे सहा कोटींचा निधी खेचून आणला. रुईकर कॉलनीत अनेक वर्षांपासूनची रखडलेली कामे पूर्ण केली. येथील मैदानात ३० लाखांच्या निधीतून विकासकामे केली. यामध्ये स्केटिंग ट्रॅक, एलईडी पोल, पाथवे, स्ट्रीट लाईट बसविले. अमृत योजनेतून ड्रेनेजलाईन टाकली. घाटगे कॉलनीत ज्येष्ठ नागरिकांसाठी पाच लाखांच्या निधीतून हॉलचे काम सुरू आहे.

सीमा कदम, नगरसेविका

चौकट

शिल्लक कामे

लिशा हॉटेल ते पाटोळेवाडी रस्ता

लिशा हॉटेल ते मार्केट यार्ड मार्गावर हॉटेलची संख्या जास्त असून, पार्किंगची समस्या

पावसाळ्यात सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने रस्त्यावर

बहुतांश परिसरात ड्रेनेजलाईन नसल्याचा फटका

नवीन बांधकामावेळी नाल्याची रुंदी कमी केल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर

ओपन स्पेस विकसित केलेले नाहीत.

चौकट

गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते

सीमा कदम ताराराणी आघाडी १४०५

शीतल प्रमाेद देसाई काँग्रेस ११६४

आशा सवईसर्जे राष्ट्रवादी ३२०

वैष्णवी पाटील शिवसेना २२२

फाेटो : ०४०२२०२१ कोल केएमसी महाडिक वसाहत प्रभाग

ओळी : कोल्हापुरातील महाडिक वसाहत प्रभाग क्रमांक १८ मध्ये रुईकर कॉलनी येथील मैदानात स्केटिंग ट्रॅक करण्यात आला आहे.

Web Title: Improved: Bitter challenge to opponents of 'Tararani' in Mahadik colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.