सुधारित : शेंडा पार्कातील २० हेक्टरमधील झाडे जळून खाक; जगविलेल्या झाडांचे नुकसान : सामाजिक वनीकरणाने लावली होती झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:24 AM2020-12-22T04:24:52+5:302020-12-22T04:24:52+5:30
कोल्हापूर : राज्य शासनाच्या शेंडा पार्क येथील खुल्या जागेतील वाळलेल्या गवताला मोठी आग लागून त्यामध्ये सामाजिक वनीकरणाचे शतकोटी योजनेतील ...
कोल्हापूर : राज्य शासनाच्या शेंडा पार्क येथील खुल्या जागेतील वाळलेल्या गवताला मोठी आग लागून त्यामध्ये सामाजिक वनीकरणाचे शतकोटी योजनेतील झाडे जळून गेली. सुमारे ३० हेक्टरपैकी २० हेक्टर जागेवर आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. सकाळी दहा वाजता लागलेली आग सुमारे पाच तासांहून अधिक काळ सुरू होती. महापालिका अग्निशमन दलाच्या चार बंबांनी अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली.
शेंडा पार्क येथे सुमारे ३० हेक्टर जागेत सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने तीन वर्षांपूर्वी शतकोटी योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्चून वृक्षारोपण केले होते. झाडे पाच फुटांहून उंच झाली होती. येथे वाळलेले गवत कापणीचे कामही सुरू होते. सोमवारी आर. के. नगर सोसायटीकडील कोंडाळ्यास आग लागली होती. त्याची धग पसरून पूर्वेच्या ओढ्याकडून गवताला आग लागली. वाळलेले गवत असल्याने क्षणातच आग वाऱ्यामुळे पसरली. धुराचे लोट रस्त्यापर्यंत पोहोचले. महापालिकेच्या अग्निशमन दलाचे चार बंब तातडीने दाखल झाले; पण घटनास्थळापर्यंत ते नेण्यास चर मारली असल्याने अडचणी आल्या. खडकाळ जागेतून ही वाहने आत नेली. त्यानंतर ही आग आटोक्यात आणली. खडकाळ जागेतून ‘अग्निशमन’चे बंब आत नेल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले. नागरिक, विद्यार्थी तसेच वनीकरणाचे अधिकारी, कर्मचारीही आग विझविण्यासाठी धावले. आगीत लाखो रुपयांची झाडे जळाली. अग्निशमनचे प्रभारी स्थानक अधिकारी जयवंत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ जवानांनी चार बंबांसह शर्थीचे प्रयत्न केले.
पक्षी, सरपटणारे प्राणी होरपळले
आगीमध्ये अनेक पक्षी व सरपटणाऱ्या प्राण्यांचा होरपळून मृत्यू झाला. गवत जळून खाक झाल्यानंतर त्यामध्ये अनेक पक्षी, सरपटणारे प्राणी मृतावस्थेत सापडले.
कोट..
ही आग कोणी वाईट हेतूने लावली का, यामध्ये किती लाखाचे वृक्ष जळून खाक झाले, याची चौकशी करण्यात येत आहे.
- एस. बी. देसाई, वनपाल.
कोट..
सामाजिक वनीकरणाने वृक्षारोपण केले असले तरीही अचानक दुर्घटना घडल्यास आपत्कालीन सुविधा पोहोचण्यासाठी सोय न केल्याबद्दल वन विभागास नोटीस बजावण्यात येईल.
- जयवंत खोत,
प्रभारी स्थानक अधिकारी,
अग्निशमन दल, कोमनपा.
(फोटो फिचर करावे.. स्वतंत्र पाठवत आहे)
(तानाजी)