सुधारीत...‘गोकूळ’च्या म्हैस दूध खरेदी, विक्री दरात दोन रुपयांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:18 AM2021-07-10T04:18:12+5:302021-07-10T04:18:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकूळ) म्हैस दूध खरेदी व विक्री दरात प्रतिलिटर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकूळ) म्हैस दूध खरेदी व विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपये तर गाय खरेदी दरात रुपया व विक्री दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दराची उद्या, रविवारपासून अंमलबजावणी केली जाणार असून वाढीव विक्री दर कोल्हापूर, सांगली व कोकण वगळता इतर ठिकाणी केल्याची माहिती संघाचे नेते, पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
मंत्री पाटील म्हणाले, दोन महिन्यांपूर्वी झालेल्या ‘गोकूळ’च्या निवडणुकीत उत्पादकांना दोन रुपये जादा दर देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार वरकट खर्चासह इतर बाबींमध्ये काटकसरीचे धोरण संचालकांनी घेतले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे मुंबईत जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच हा प्रश्न संपेल.
‘अमूल’ दूध संघाने दूध विक्री दरात वाढ केली असून त्यांच्या स्पर्धेत राहण्यासाठी ‘गोकूळ’ने ही म्हैस व गाय दूध विक्री दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ कोल्हापूर, सांगली व काेकण वगळून राहणार असून म्हैस दूध खरेदी दरात दोन तर गाय दूध खरेदी दरात रुपयांची वाढ केली आहे. म्हैस दूध वाढीकडे आपले लक्ष केंद्रित करायचे असून आगामी काळात वीस लाख लिटरचा टप्पा गाठायचा असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
‘गोकूळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी आढावा घेतला.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर, राजेश पाटील, राजू आवळे, ऋतुराज पाटील, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील व संचालक उपस्थित होते.
शुध्द हेतुमुळे नियतीही आमच्यासोबत
प्रामाणिक व शुध्द हेतूने आम्ही ‘गोकूळ’च्या सत्तेत आलो, त्यामुळेच दोन महिन्यातच उत्पादकांना दोन रुपये जादा दर देऊ शकलो. दरवाढ कशी द्यायची असा प्रश्न असतानाच ‘अमूल’ने दरवाढ केली, यावरून नियतीही आमच्यासाेबत असल्याचे सिध्द झाल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
दोन कोटीचा अतिरिक्त बोजा
‘गोकूळ’ने खरेदी दरात वाढ केल्याने वर्षाला ७१ कोटी जादा द्यावे लागणार आहेत, मात्र विक्री दरवाढीमुळे त्यातून ६९ कोटी मिळणार असून दोन कोटी अतिरिक्त बोजा संघावर पडणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
अशी केली बचत-
लाळ खुरकट लस शासनाकडून मोफत उपलब्ध करून देणार असल्याने त्यातून २४ लाख.
आयुर्वेेदिक औषधोपचार पध्दतीमुळे २४ लाख
पशुखाद्य वाहतूक नवीन टेंडरमुळे १.५० ते २ कोटी .
स्थानिक दूध वाहतूक रुट पुनर्नियोजनामुळे १ कोटी
मुंबई, पुणे टँकर दूध वाहतूक दरात कपात केल्याने ५ कोटी ३२ लाख
पॅकिंग महानंदकडून घेतल्याने १ कोटी १८ लाख.
कंत्राटी कर्मचारी कमी व क्रेट स्वच्छता ठेका रद्द केल्याने ३ कोटी २० लाख
असा राहणार खरेदीचा दर
म्हैस
फॅट जुना दर नवीन दर रुपयात
६.० ३९.५० ४१.५०
७.० ४४ ४६
८.० ४७ ४९
९.० ५० ५२
१०.० ५३ ५५
गाय
फॅट जुना दर नवीन दर
३.५ २६ २७
४.० २७.५० २८.५०
४.५ २९ ३०
५.० ३०.५० ३१.५०
मुंबई, पुण्यातील विक्री दर असे
वर्ग आताचा दर नवीन दर
म्हैस ५८ ६०
गाय ४७ ४९