(सुधारीत) अत्यावश्यक सेवेसह सर्व व्यापाऱ्यांचा आज दुपारपर्यंत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:29 AM2021-06-09T04:29:12+5:302021-06-09T04:29:12+5:30
कोल्हापूर : शहरातील सर्वच व्यवसाय, दुकाने सुुरू करण्यास परवागी द्या, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज, बुधवारी सकाळी अत्यावश्यक, ...
कोल्हापूर : शहरातील सर्वच व्यवसाय, दुकाने सुुरू करण्यास परवागी द्या, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज, बुधवारी सकाळी अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवेसह सर्वच व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या व्यापक बैठकीत घेतला. शिवाजीराव देसाई सभागृहात चेंबर व सलग्न संघटना बैठकीच्या अध्यक्षस्थानी संजय शेटे हे होते. सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत व्यवसाय बंद ठेवून व्यापारी तेथेच विनाघोषणा बॅनर घेऊन आंदोलन करणार आहेत.
कोरोनामुळे दोन महिने अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवसाय निर्बंधांनुसार बंद राहिले. त्यामुळे व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले. सर्व व्यवसाय सुरू करण्याचे शासनाने अद्यादेश काढावेत, यासाठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला, पण ४ जूनच्या अध्यादेशानुसार पुन्हा जीवनावश्यक वस्तूव्यतिरिक्त इतर व्यवसाय बंद राहणार हे स्पष्ट झाल्याने आमच्या अस्तित्वासाठी व्यापारी रस्त्यावर उतरत असल्याचे अध्यक्ष शेटे यांनी सांगितले.
बैठकीत संजय पाटील, धनंजय दुग्गे, राजू पाटील, आनंद माने, भरत ओसवाल, संदीप वीर, अभय अथणे, हरिभाई पटेल, संजय पाटील, विद्यानंद मुळे, अजित कोठारी, तौफीक मुलाणी, अनिल धडाम, शांताराम सुर्वे, कुलदीप गायकवाड, अरुण सावंत, प्रवीण शहा, विक्रम निसार, नितीन मांगलेकर यांनीही भावना व्यक्त केल्या.
स्टोन ट्रेडर्स असोसिएशन, प्लायवूड डिलर्स असोसिएशन, जिल्हा फूटवेअर्स असोसिएशन, वाईन मर्चंट्स असोसिएशन, हॉटेल मालक संघ, जिल्हा बार असोसिएशन, सराफ व्यापारी संघ, जिल्हा सराफ संघ, कापड व्यापारी संघ, रेडिओ इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन, कॉम्प्युटर असोसिएशन, आयटी असोसिएशन, पानपट्टी असोसिएशन, स्पेअर पार्टस् अँड ऑटोमोबाईल्स डिलर्स असोसिएशन, रेडिमेड गारमेंट्स असोसिएशन, इलेक्ट्रिक असोसिएशन, भांडी व्यापारी असोसिएशन, टू व्हिलर स्पेअर पार्टस् असोसिएशन तसेच औद्योगिक संघटनांनी पाठिंबा व्यक्त केला. चेंबरचे उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार यांनी आभार मानले.
दुधासह औद्योगिक क्षेत्र सुरू, औषध दुकाने बंद
आज, बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील औषध दुकाने, किरणा दुकाने, भाजीपाला विक्री आदी सर्वच व्यवसाय बंद राहणार आहेत. पण दूध नेहमीप्रमाणे वितरण होईल तर औद्योगिक संस्था व्यवसाय सुरू ठेवून आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.
जीवनावश्यक, अत्यावश्यक सेवेतील असो.चाही पाठिंबा
व्यवहार चालू असलेल्या जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवेतील केमिस्ट असोसिएशन, ग्रेन मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष अभय अथणे, किराणा व भुसार असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीपभाई कापडिया, टिंबर असोसिएशनचे सचिव हरिभाई पटेल व कन्झ्युमर प्रोडक्ट्स डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनीही व्यवहार बंद ठेवून पाठिंबा जाहीर केला.
फोटो नं.०८०६२०२१-कोल-चेंबर मिटींग०१
ओळ : कोल्हापुरातील सर्वच व्यवसाय सुरू करावेत या मागणीबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, तसेच सलग्न संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी राजू पाटील, शिवाजीराव पोवार, संजय पाटील, धनंजय दुग्गे, जयेश ओसवाल आदी उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)
फोटो नं.०८०६२०२१-कोल-चेंबर मिटींग०२
ओळ : बैठकीस व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.