सुधारित : टँकरमधून महाडिकांना दहा वर्षांत १३४ कोटींचा मलिदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:31 AM2021-06-09T04:31:28+5:302021-06-09T04:31:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) टँकरमधून माजी आमदार महादेवराव महाडिक यांना गेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) टँकरमधून माजी आमदार महादेवराव महाडिक यांना गेल्या दहा वर्षांत तब्बल १३४ कोटी रुपये मिळाले आहेत. अनेक वर्षे ‘व्यंकटेश्वरा गुडस् मूव्हर्स’ व ‘कोल्हापूर आइस कोल्ड स्टोअरेज’च्या माध्यमातून संघाचा मलिदा लाटण्याचे काम त्यांनी केल्याचा आरोप पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला. ‘गोकुळ’चा व्यवहाराची माहिती घेतल्यानंतर डोळे फिरले असून, संघाच्या पूर्वीच्या नेत्यांचा कारभार उत्तर कोरियाचा प्रमुख किम जोंगसारखा होता, अशी बोचरी टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे केली.
रोज मिळणारा मलिदा वाचविण्यासाठीच महाडिक संघाच्या निवडणुकीत ‘३:१३:२३’ तारखेचे तुणतुणे वाजवीत होते. त्यांचा ‘गोकुळ’मधील स्वार्थ लोकांसमोर आल्यानेच सत्तांतर झाल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. त्यांनी महाडिक यांना प्रत्येक वर्षी टँकर भाड्यापोटी किती रक्कम मिळाली याची गेल्या दहा वर्षांतील वर्षनिहाय रकमेचा चार्टच यावेळी पत्रकारांना उपलब्ध करून दिला. टँकर भाड्यापोटी महिन्याला किमान १ कोटी रुपये त्यांना संघातून मिळत होते हे त्यावरून स्पष्ट झाले. गोकुळ शिरगाव येथील प्रकल्पावर ‘गोकुळ’च्या वीस लाख लिटर दूध संकलन अमृतकलशाचे पूजन मंत्री मुश्रीफ व मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. ‘गोकुळ’चे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी बैठक घेतली.
पालकमंत्री पाटील म्हणाले, उत्पादकांना दोन रुपये जादा दर देणे, हा आमचा अजेंडा आहे. संघाचा तोटा कमी करण्यासाठी टँकरचे दर कमी करणार आहे. पशुखाद्य कच्चा माल खरेदीत पारदर्शकता, त्याचे वितरण तालुकास्तरावर कसे होईल, वर्षाला तीन लाख लिटर दूध संकलन वाढ याचे नियोजन केले आहे. राष्ट्रीय कृषी योजनेचे संघाचे ५० कोटी प्रलंबित असून, तेही लवकर देण्याचा प्रयत्न करू.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, मागील संचालक मंडळाने एनडीडीबीचे कर्ज काढून २० लाख लिटरपर्यंत क्षमता वाढविली आणि नोकरभरती केली. हे सगळे पाहून डोळे चक्रावून असून, स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पुतळ्यासमोर शपथ घेऊन २० लाख लिटर दूध संकलनाचे शिवधनुष्य उचलले आहे. दीड वर्षापूर्वी जाता-जाता २७५ कर्मचाऱ्यांची भरती केली, कायदा पायदळी तुडवून दोन महिन्यांच्या प्रशिक्षणार्थी कालावधीनंतर त्यांना कायम केले. संघाला अडचणीत आणणारा असा निर्णय घेताना लाज कशी वाटली नाही. मागील संचालक मंडळ व त्यांच्या नेत्यांचा कारभार उत्तर कोरियाचा प्रमुख किम जोंग उन याच्यापेक्षा कमी नव्हता.
----
एक म्हैस घेतली तर...
सध्या कर्नाटक व सांगली जिल्ह्यातून रोज तीन लाख लिटर दूध येते. त्याचबरोबर जिल्ह्यातच विशेष करून म्हैस दूध वाढीसाठी योजना आणणार आहे. जिल्ह्यात साडेसात लाख उत्पादक आहेत, त्यांना एक म्हैस दिली तर आपण उद्दिष्टापर्यंत जाऊ शकतो, असे मंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
जिल्हा बँकेकडून म्हैस, गाय खरेदीसाठी ५०० कोटी
‘गोकुळ’च्या म्हैस दुधाला चांगली मागणी असून, दूध वाढीसाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून नवीन कर्ज योजना सुरू करीत आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून पाचशे कोटी कर्जाचे वाटप करणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
पगारावर १३० कोटी खर्च
‘वारणा’सह इतर पाच लाख लिटर दूध संकलन असणाऱ्या संघांचा वर्षाला पगारावर १६ ते २० कोटी खर्च होतो. मात्र, ‘गोकुळ’चा तब्बल १३० कोटी खर्च आहे. गरज नसताना राजकारणासाठी नोकरभरती केल्याने एवढा खर्च होत असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
तर ‘गोकुळ’ पांढरा हत्ती झाला असता
गाय व म्हैस दूध संकलन निम्मे-निम्मे झाले असून, हा बॅलेन्स चुकला तर ‘गोकुळ’ पांढरा हत्ती झाला असता. परमेश्वर व नियतीच्या मनात काहीतरी चांगले करायचे होते म्हणून आमच्याकडे सत्ता सोपविल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
आमचा अजेंडा...
खर्च कमी करून उत्पादकांना दोन रुपये जादा दर
वर्षाला तीन लाख लिटर दूध संकलन वाढ
तीन वर्षात २० लाख लिटरचा टप्पा पार
पाच वर्षांत दोन हजार कोटींच्या ठेवी करणार