सुधारीत- परस्पर उपचार,औषधे दिल्यास डॉक्टर-मेडिकलवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:18 AM2021-07-20T04:18:30+5:302021-07-20T04:18:30+5:30
कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खासगी डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणाऱ्या, कोविड लक्षणे असणाऱ्या रुग्णांची नोंद ठेवावी. मेडिकल दुकानदारांनीही लक्षणे असणाऱ्या ...
कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खासगी डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणाऱ्या, कोविड लक्षणे असणाऱ्या रुग्णांची नोंद ठेवावी. मेडिकल दुकानदारांनीही लक्षणे असणाऱ्या रुग्णांना औषध देताना औषध वाटप वहीत नोंद करावी, त्यांना तपासणी करण्यास सांगावे, अशा व्यक्तींची नोंद न ठेवता परस्पर उपचार केल्याचे किंवा औषधे दिल्याचे आढळल्यास डॉक्टर आणि मेडिकलवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला.
ते म्हणाले, खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी येणाऱ्या कोविडसदृश लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी ‘आरटीपीसीआर’ टेस्ट करून घेणे बंधनकारक आहे. ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, श्वसनाचा त्रास असलेली व्यक्ती डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर औषध दुकानदारांकडे औषध मागत असेल तर दुकानदाराने त्याला डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून औषध घ्यायला सांगावे तसेच मेडिकल दुकानदारांनी लक्षणे असणारी व्यक्ती औषध घेण्यास आल्यास त्यांनी त्यांच्या नोंदवहीत नोंद करून ‘आरटीपीसीआर’ टेस्ट करण्याच्या सूचना द्याव्यात. ही औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देऊ नयेत. डॉक्टरांनीही रुग्णाची नोंद ठेवावी याबाबत कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन यांच्याशी चर्चा झाली आहे. औषध दुकानदार यांच्या नोंदवहीतील माहिती रोज गोळा करण्यासाठी तहसीलदार यांच्या आदेशाने कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, या नियमांना डावलून परस्पर उपचार व औषधे दिल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
---
उपचारासाठी आलेल्या रुग्णाला कोरोनाची लक्षणे दिसल्यास आम्ही तपासणी करण्याचा आग्रह धरतोच. या पावसाळी वातावरणात सर्दी, ताप, खोकला याचा संसर्ग होतच असतो पण जिल्ह्याची कोरोना स्थिती गंभीर आहे आणि ती आटोक्यात आणायची असेल तर या उपाययोजना केल्याच पाहिजेत अशीच डॉक्टरांची भूमिका आहे.
- डॉ. आशा जाधव
अध्यक्ष, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन
---
जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेनुसार असोसिएशनच्यावतीने सर्व मेडिकल दुकानदारांना कोरोनासदृश लक्षणे असलेल्या रुग्णांची नोंद ठेवणे, त्यांना तपासणी करण्यास सांगणे व डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे देऊ नये व कोणत्या पद्धतीने नोंद ठेवायची आहे, याबाबतचे पत्र देण्यात आले आहे. सर्वांची माहिती संकलित करून ती रोज जिल्हा प्रशासनाला कळविली जाईल.
संजय शेटे
अध्यक्ष कोल्हापूर डिस्ट्रीक्ट केमिस्ट असोसिएशन
----