सुधारित बातमी - सण उत्साहाचा, मांगल्याचा, खरेदीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:27 AM2021-09-06T04:27:46+5:302021-09-06T04:27:46+5:30

कोल्हापूर : उत्साहाचा, मांगल्याचा सण असलेला गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने संपूर्ण जिल्ह्यातील वातावरण उत्सवमय झाले आहे. बाप्पाच्या ...

Improved news - festivals of excitement, goodwill, shopping | सुधारित बातमी - सण उत्साहाचा, मांगल्याचा, खरेदीचा

सुधारित बातमी - सण उत्साहाचा, मांगल्याचा, खरेदीचा

googlenewsNext

कोल्हापूर : उत्साहाचा, मांगल्याचा सण असलेला गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने संपूर्ण जिल्ह्यातील वातावरण उत्सवमय झाले आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी करवीरनगरी सज्ज झाली असून, बाजारपेठेत सजावटीचे साहित्य खरेदी करण्याकरिता रविवारी बाजारपेठेत गणेशभक्तांची मोठी गर्दी उसळली. रविवारी सुटीचा दिवस असल्याने शहरातील पापाची तिकटी, गंगावेश, महाद्वार रोड, बाजारगेट, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी परिसरांत खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला.

जिल्ह्यात अनेकांनी आपल्या बाप्पांच्या मूर्तीची ऑर्डर देऊन बुक करून ठेवल्या आहेत. रविवारीही मूर्ती कुटुंबासह येऊन ठरविल्या. त्यामुळे कुंभारवाडेही गर्दीने फुलले आहेत. कुंभार बांधवही गेल्या काही दिवसांपासून रात्रीचा दिवस करून मूर्ती विक्रीसाठी सज्ज ठेवत आहेत.

श्री गणेशाच्या आगमनासाठीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. हरएक प्रकारच्या सजावटीच्या साहित्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. यात मोतीहार, झेंडू फुलांच्या माळा, झुंबर, डिस्को फाॅल, झेंडू लटकन, मेटल बाॅल, मेटल चेन, स्टेप बाॅल, कागदी पंखा, मेटल पंखा, चंद्राहार, गौरी सेट, बाजू बंद, मंगळसूत्र, बोरमाळ, किरीट, फ्रुट लड्डी, वेलवेट बाॅल, काचबाॅल, फुल्ल लडी, चुनरी, फुल छत्री, गारलीन, सॅटीनचे पडदे, पानाफुलांच्या लडी या साहित्याची मांडणी करण्यात आली आहे. बाजारगेट, पापाची तिकटी, गंगावेश, महाद्वार रोड, ताराबाई रोड, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी परिसरातील दुकानांमध्ये हे साहित्य अडकविण्यात आले आहे.

विविध रंगांच्या विद्युत माळा, विविध रंगाचे बल्ब, लेसर बल्ब खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. रंगीबेरंगी पडदे, लाकडी चौरंग, मंदिराच्या प्रतिकृती विक्रीसाठी बाजारात आाल्या आहेत. गणपतीसाठी चांदीचे दागिन्यांचीही रेलचेल आहे. चांदीचे मोदक, त्रिशुल, सुपारी-पानाची प्रतिकृती, डोक्यावरील मुकुट, दुर्वा अशा चांदीच्या वस्तूंना मागणी आहे.

गणेशोत्सवासाठी बाजारपेठ नव्याने सजली आहे. नागरिकही खरेदीला मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. उत्सव जसजसा जवळ येईल, तसे बाजारपेठेतील उत्साह वाढायला लागला आहे. रात्री दहा वाजेपर्यंत दुकाने सुरू राहत आहेत.

- गणेशमूर्तींचे आगाऊ आरक्षण-

रविवारी सुटीचा वार असल्यामुळे अनेक कुटुंबे गंगावेश, पापाची तिकटी, बापट कॅम्प, शाहूपुरी येथील कुंभार गल्लीत गणेशमूर्ती पाहून त्यांचे आगाऊ आरक्षण करीत होते, तर अनेकांनी आगाऊ रकमा देऊन आपल्या मूर्ती निश्चित केल्या. त्यामुळे या बाजारात गर्दीच गर्दी होती.

-प्रतिक्रिया-

अवघ्या चार दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी बाजारात हरएक तऱ्हेचे सजावटीचे साहित्य आले आहे. अगदी २० ते २५०० रुपयांपर्यंत या साहित्याच्या किमती आहेत. जसजसा उत्सव जवळ येईल तसे बाजारात सजावटीच्या साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे.

नौशाद मोमीन, (सजावट साहित्य विक्रेते)

-प्रतिक्रिया-

सजावटीच्या साहित्यखरेदीसाठी रविवार असल्यामुळे गर्दी होऊ लागली आहे. जसजसा सण जवळ येईल तसे बाजारात उत्साही वातावरण निर्माण होत आहे.

- सागर ब्रह्मपुरे, रुमाल विक्रेता

Web Title: Improved news - festivals of excitement, goodwill, shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.