सुधारित बातमी - विकतच्या भाजीसोबत त्यांनी वाटला फुकटचा कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:22 AM2021-04-19T04:22:36+5:302021-04-19T04:22:36+5:30
कोल्हापूर : सुपर स्पेडर म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या भाजी विक्रेत्यापैकी २१ विक्रेते रविवारी कोरोनाबाधित आढळून आले. लक्ष्मीपुरी ...
कोल्हापूर : सुपर स्पेडर म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या भाजी विक्रेत्यापैकी २१ विक्रेते रविवारी कोरोनाबाधित आढळून आले. लक्ष्मीपुरी जेव्हा रॅपिड अँटिजेन तर कपिलतीर्थ भाजी मंडईत आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली तेव्हा ही धक्कादायक बाब उघडकीस आली. या भाजी विक्रेत्यांनी विकतच्या भाजीसोबत फुकटचा कोरोना किती तरी जणांना वाटला असण्याची शक्यता असल्याने खळबळ उडाली आहे.
सुपर स्पेडर असलेल्या भाजी विक्रेते, फळविक्रेते यांची रॅपिड अँटिजन चाचणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून त्याची सुरुवात कपिलतीर्थ मंडईपासून झाली. रविवारी लक्ष्मीपुरी परिसरात मोबाइल व्हॅनद्वारे व्यापारी, भाजी विक्रेते व फळविक्रेते यांची रॅपिड अँटिजन चाचणी करण्यात आली. यामध्ये एकूण १२५ नागरिक, व्यापारी, भाजी विक्रेते, फळविक्रेते यांची तपासणी झाली. त्यावेळी ११९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर ग्रामीण भागातून भाजी विक्रीसाठी आलेल्या सहा विक्रेत्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ज्यावेळी ही चाचणी झाली, त्यावेळी हे विक्रेते भाजी विकत होते. विक्रेत्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सर्वांना धक्का बसला.
रविवारी आढळलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण किती दिवसांपासून भाजी विक्री करत होते, त्यांच्या संपर्कात किती लोक आले, याचा अंदाज काही महापालिका प्रशासनाला आलेला नाही. लक्ष्मीपुरीसारख्या गजबजलेल्या भाजी मंडईत, रस्त्यावर विक्री करणारे अनेक विक्रेते मास्क लावत नाहीत. सोशल डिस्टन्स राखत नाहीत. त्यामुळे या सहा जणांनी किती जणांना भाजीसोबत फुकटचा कोरोना वाटला, याच्या कल्पनेनेच अन्य भाजी विक्रेते, ग्राहक हादरले आहेत.
-कपिलतीर्थ भाजी मंडईत १४ विक्रेते पॉझिटिव्ह-
फेरीवाले, भाजी विक्रेते यांना आरटीपीसीआर चाचणी व लसीकरण पूर्ण करून घेण्याच्या सूचना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिल्या होत्या. गेल्या सोमवारी (दि.१२) विशेष कॅम्पचे आयोजन करून कपिलतीर्थ भाजी मंडई येथील २५१ भाजी, फळविक्रेते व फेरीवाले यांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये १४ जण पॉझिटिव्ह आढळून आले. या १४ भाजी विक्रेत्यांना व फेरीवाल्यांना डीओटी सेंटरला अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
शहरामध्ये संचारबंदी असूनही अत्यावश्यक कामाच्या नावाखाली नागरिक गर्दी करत आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मोबाइल व्हॅनद्वारे रॅपिड अँटिजन चाचणी करण्याच्या सूचना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिल्या होत्या. भाजी मंडईत बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिक, व्यापारी, विक्रेते यांच्यामुळे संक्रमणाचा धोका वाढत चालला आहे. नागरिकांनी भाजी, फळे खरेदी करताना गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, मास्कचा वापर व सॅनिटाइजरचा वापर करावा. अन्यथा अशी गर्दीची ठिकाणे हॉटस्पॉट होण्याची शक्यता आहे.
- भाजी विक्रीवर नियंत्रणाचा अभाव-
भाजी मंडई असो की रस्त्यावरील विक्री असो, त्यावर अजूनही कोणाचे नियंत्रण नाही. भाजी विक्रेते एकास एक लागून बसतात. तेथे खरेदीसाठी गर्दी होते. लक्ष्मीपुरीत लागून बसतात. तेथे खरेदीसाठी गर्दी होते. लक्ष्मीपुरीत धान्य, फळे, भाजी असे बाजार भरतात. तेथील गर्दी विकेंद्रित करण्याचे प्रयत्न अजूनही झालेले नाहीत. त्यामुळे तेथील गर्दी कोरोनाचा प्रसार करण्यास कारणीभूत ठरत आहे.