सुधारित : सात बोगस डॉक्टर व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:25 AM2021-03-16T04:25:53+5:302021-03-16T04:25:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात खोटे प्रमाणपत्र तयार करून व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात खोटे प्रमाणपत्र तयार करून व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी दिले. जिल्ह्यात सात बोगस डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे निप्पन्न झाले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, गृह पोलीस उपाधीक्षक सुनीता नाशिककर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांत सात डॉक्टर बेकायदेशीररीत्या वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे आढळले आहेत. यासह सध्या सुरू असलेल्या प्रकरणांचा आढावा यावेळी घेण्यात आला.
या डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल यांच्याकडे पडताळणीसाठी पाठवण्यात यावे. त्यांचा अहवाल आल्यानंतर तालुका स्तरावरील आरोग्य अधिकारी तसेच महापालिका क्षेत्रातील आरोग्य अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी. अहवालात प्रमाणपत्र बोगस आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
--
बोगस डॉक्टरांची संख्या
हातकणंगले : ०५
करवीर : ०१
महापालिका क्षेत्रात : ०१