सुधारित : ‘शाहूपुरी तालमी’त तुल्यबळ मल्ल रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:17 AM2021-01-10T04:17:23+5:302021-01-10T04:17:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या शाहूपुरी तालीम (प्रभाग क्रमांक २५) मध्ये सध्या इच्छुकांची संख्या कमी ...

Improved: In ‘Shahupuri Talmi’ in equal wrestling arena | सुधारित : ‘शाहूपुरी तालमी’त तुल्यबळ मल्ल रिंगणात

सुधारित : ‘शाहूपुरी तालमी’त तुल्यबळ मल्ल रिंगणात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या शाहूपुरी तालीम (प्रभाग क्रमांक २५) मध्ये सध्या इच्छुकांची संख्या कमी असली तरी तगडे उमेदवार रिंगणात असल्यामुळे येथील महापालिका निवडणूक चुरशीची होणार आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी प्रभाग आरक्षित झाल्याने कही खुशी कही गम आहे. शेजारील व्हीनस कॉर्नर (प्रभाग क्रमांक १४) महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे येथील इच्छुकांनीही या प्रभागातून चाचपणी सुरू केली आहे.

राजर्षी छत्रपती शाहू यांनी १०० वर्षांपूर्वी नियोजन करून शाहूपुरी ही व्यापारीपेठ वसवली. माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे येथील प्रभागावर वरचष्मा राहिला आहे. २००५ ते २०२० पर्यंत त्यांच्या कुटुंबाने पाच वेळा प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये २०१५ मध्ये प्रकाश नाईकनवरे आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा नाईकनवरे दोघेही आजूबाजूच्या दोन प्रभागांतून निवडून आले. यावेळी प्रतिभा नाईकनवरे यांना महापौरपदाची संधीही मिळाली. गत निवडणुकीत सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी प्रभाग आरक्षित होता. यावेळी प्रकाश नाईकनवरे यांच्या स्नुषा पूजा नाईकवरे शाहूपुरी तालीम प्रभागातून विजयी झाल्या. शिवसेनेच्या वैष्णवी समर्थ यांनी त्यांना तगडे आव्हान दिले होते. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला.

यंदाच्या निवडणुकीत वैष्णवी समर्थ यांचे चिरंजीव अमर समर्थ या प्रभागातून इच्छुक आहेत. महापूर आणि कोरोनामध्ये ते नागरिकांच्या मदतीला धावून आले होते. यंदाची निवडणूक शिवसेनेऐवजी काँग्रेसमधून लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे गटनेते राहुल चव्हाण यांचा प्रभाग क्रमांक १४ सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला असल्याने ते शाहूपुरी तालीम प्रभागातून इच्छुक आहेत. गेल्या पाच वर्षांत त्यांनी शाहूपुरीतील प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडले. घरफाळा सर्वेक्षणातील घोटाळा उघडकीस आणला. महापुरात मदत कार्य केले. याचबरोबर सुनील सन्नके, अमित टिक्के. धनंजय दुग्गे यांच्या नावाची चर्चा आहे. गणेश काटे यांच्या पत्नी पूनम याही निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

चौकट

प्रकाश नाईकनवरे यांचा ताराराणी आघाडीला ‘रामराम’

प्रकाश नाईकनवरे यांनी या निवडणुकीत ताराराणी आघाडीसोबत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. शाहूपुरी तालीम प्रभागात माजी आ. मालोजीराजे, गृहराज्यमंत्री सतेज पाटील जो उमेदवार देतील, त्याला निवडून आणण्यासाठी जिवाची बाजी लावणार आहेत.

प्रतिक्रिया...

विरोधी आघाडीत असतानाही अडीच कोटींचा निधी खेचून आणला. शाहूपुरी भाजी मार्केट येथील पाण्याच्या टाकीचा प्रश्न वारंवार सभागृहात मांडला. तातडीचा पर्याय म्हणून येथून बायपासने प्रभागात पाणीपुरवठा केला. सभागृहात तसेच स्थायी समितीमध्ये केवळ प्रभागाचा विचार न करता संपूर्ण शहराच्या विकासकामांसाठी आवाज उठविला. सतत पाठपुरवा केल्यामुळे अहिल्याबाई होळकर दवाखाना ते कब्रस्थान येथे कपांऊंड वॉलसाठी १ कोटींचा निधी आणि भाजी मंडई, पाण्याच्या टाकीच्या परिसरात शौचालय उभारण्याची कामे प्रस्तावित आहेत.

-पूजा नाईकनवरे, नगरसेविका

चौकट

पाच वर्षांत झालेली विकासकामे

प्रभागात सुसज्ज चार सांस्कृतिक हॉलची उभारणी

बागल चौक कब्रस्थान परिसरात १० लाखांच्या निधीतून पोव्हिंग ब्लॉक बसवले.

पिण्याची पाइपलाइन, ड्रेनेजलाइन आणि रस्ते डांबरीकरण

पाण्याची समस्या सोडविण्यासाठी बोअरची उभारणी

अमृत योजनेतून पिण्याची पाइपलाइन टाकल्या.

प्रभागात एलईडी दिवे बसवले.

समस्या...

शाहूपुरी भाजी मंडई परिसरात १० वर्षांपासून पाण्याची टाकी बांधूनही धूळखात

बाजारपेठ असल्यामुळे खाऊ गल्लीसह प्रभागात पार्किंगची समस्या

पंत बाळेकुंद्री मार्केट १५ वर्षांपासून वापराविना धूळखात

बागल चौक ते बीटी कॉलेज रस्त्याची दुरवस्था

शाहूपुरी तिसरी, चौथी आणि सहाव्या गल्लीतील रस्त्यांची दयनीय आवस्था

चौकट

पूजा नाईकनवरे (ताराराणी आघाडी) २२६१

वैष्णवी समर्थ (शिवसेना) १९५५

दीपाली डोईफोडे (राष्ट्रवादी) २७९

दीपाली जाधव (काँग्रेस) ५०

चौकट

कोडे सुटणार कसे

अमर समर्थ आणि राहुल चव्हाण यांनी शाहूपुरी तालीम आणि व्हीनस कॉर्नर या दोन प्रभागांत फिल्डिंग लावली आहे. एका प्रभागातून स्वत:, तर दुसऱ्या प्रभागात पत्नी असे त्यांचे नियोजन आहे, तर पूजा नाईकनवरे व्हीनस कॉर्नरमधून इच्छुक आहेत. चव्हाण शिवसेनेतून, तर नाईकनवरे आणि समर्थ काँग्रेसमधून इच्छुक आहेत. पक्षाची उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे लक्ष लागून असून तगडे उमेदवार असल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

फोटो : ०७०१२०२० कोल केएमसी शाहूपुरी तालीम

ओळी : कोल्हापुरातील शाहूपुरी तालीम प्रभागात पंत बाळेकुंद्री मार्केट वापराविना धूळ खात पडले आहे.

Web Title: Improved: In ‘Shahupuri Talmi’ in equal wrestling arena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.