निपाणीला अशुद्ध पाण्याचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:24 AM2021-05-11T04:24:21+5:302021-05-11T04:24:21+5:30
निपाणी : एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असताना दुसरीकडे निपाणीला अळ्या मिश्रित व गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे, यामुळे ...
निपाणी : एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असताना दुसरीकडे निपाणीला अळ्या मिश्रित व गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दोन महिन्यापूर्वी चौकशी न करता खराब वाळू घातल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी शुद्ध पाणीपुरवठा करण्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन विरोधी गटाचे नगरसेवक विलास गाडीवड्डर यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
पत्रकात नमूद केल्याप्रमाणे, गेल्या आठवड्यापासून शहर आणि उपनगरात कोरोना संसर्गाची दुसरी लाट पसरली आहे. त्याशिवाय नळाद्वारे येणाऱ्या गढूळ पाण्यामुळे आजाराचे रुग्णही वाढत चालले आहे. ४ फेब्रुवारी २१ रोजी चिक्कोडी येथील केएलई अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून शुद्धीकरण केंद्रातील वाळू बदलण्याच्या कामाच्या गुणवत्तेची पडताळणी करण्यात आली असून ते योग्य झाल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. तरीसुद्धा शहरवासीयांना गढूळ पाण्यासह अळ्या मिश्रित पाणी का प्यावे लागत आहे. अळ्या मिश्रित पाण्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्यावर नगरपालिका आयुक्तांनी संबंधितांना नोटीस बजावून काम योग्य नसल्याचे म्हटले आहे.
कोरोना काळात संसर्ग रोखण्यासह शुद्ध पाणीपुरवठा करणे पदाधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून इतर कामे करण्यातच कारभारी मंडळी व्यस्त आहेत. त्यामुळे या प्रकाराला जबाबदार कोण असा सवालही शहरवासीय व्यक्त करत आहेत. तरी सत्ताधारी व संबंधित अधिकाऱ्यांनी शहरवासीयांना स्वच्छ व मुबलक पुरवठा करून नागरिकांचे आरोग्य जपण्याची मागणी करण्यात आली आहे.