Kolhapur- इम्रान मुजावर खून प्रकरण: पाच फूट सरकारी जागेसाठी दोन कुटुंबांची वाताहत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 01:28 PM2024-09-20T13:28:31+5:302024-09-20T13:28:50+5:30
कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत स्टॉल लावून चार पैसे मिळविण्याच्या हेतूने आराम कॉर्नर येथील मुजावर आणि अलमजिद कुटुंबीय मोक्याची ...
कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत स्टॉल लावून चार पैसे मिळविण्याच्या हेतूने आराम कॉर्नर येथील मुजावर आणि अलमजिद कुटुंबीय मोक्याची जागा शोधत होते. दोन्ही कुटुंबीयांनी एकाच जागेचा आग्रह धरल्याने वाद झाला आणि क्षणिक रागातून इम्रान इमामुद्दीन मुजावर (वय ३८) या तरुणाचा खून झाला. या घटनेमुळे मुजावर कुटुंबाचा आधार गेला, तर हल्लेखोर युनूस हमीद अलमजिद (वय ३२) याला अटक झाल्याने त्याचेही कुटुंब उघड्यावर पडले. क्षुल्लक वाद चर्चेतून सुटला असता, पण क्षणिक रागाने दोन कुटुंबांची वाताहत झाली.
गणेश उत्सवात होणाऱ्या गर्दीत व्यवसाय करून चार पैसे कमविण्याची संधी व्यावसायिकांना असते. यासाठी फेरीवाल्यांची मोक्याच्या जागेवर नजर असते. आराम कॉर्नर येथील पर्स विक्रेता इम्रान मुजावर याने सोमवारीच चौकात मोक्याच्या जागी त्याची हातगाडी लावली. याच जागेवर युनूस अलमजिद यालाही स्टॉल लावायचा होता.
यातून अलमजिद याने सोमवारी दुपारी मुजावर कुटुंबीयांशी वाद घातला. आई, वडील आणि बहिणीला शिवीगाळ केल्याची माहिती मिळताच इम्रान याने मंगळवारी दुपारी अलमजिद याला जाब विचारला. याचा राग आल्याने अलमजिदने मंगळवारी रात्री इम्रानला चाकूने भोसकले. रागाच्या भरात झालेल्या घटनेत इम्रानचा जीव गेला, तर पोलिसांनी हल्लेखोर अलमजिद याला अटक केली.
वाद चर्चेतून सुटला असता
एकाच परिसरात राहणारे मुजावर आणि अलमजिद कुटुंबांमध्ये यापूर्वी कोणताही वाद नव्हता. मात्र, स्टॉलसाठी पाच फूट जागेच्या वादातून दोन घरे उद्ध्वस्त झाली. इम्रान हा अविवाहित होता. वयोवृद्ध आई-वडील आणि तीन बहिणींची जबाबदारी त्याच्यावर होती. घरातील कर्त्या तरुणाचा खून झाल्याने मुजावर कुटुंबाचा आधार गेला. हल्लेखोर युनूस आलमजिद याला अटक झाल्याने खुनाच्या गुन्ह्यात त्याला शिक्षा होणार. तो कोठडीत गेल्याने त्याची पत्नी आणि सात वर्षीय मुलीला धक्का बसला. हा वाद चर्चेतून सुटला असता.
हल्लेखोराकडून चाकू जप्त
हल्लेखोर अलमजिद याच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यातील चाकू जप्त केला. त्याला तीन दिवस पोलिस कोठडी मिळाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटोळे अधिक तपास करीत आहेत.