कोल्हापुरात सोने होते ६३ रुपये तोळा, कोणत्या साली किती होता दर.. सविस्तर वाचा
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: April 23, 2025 17:58 IST2025-04-23T17:57:55+5:302025-04-23T17:58:18+5:30
इतिहासातील दर ऐकूनच वाटते तोच खरा सुवर्णकाळ

कोल्हापुरात सोने होते ६३ रुपये तोळा, कोणत्या साली किती होता दर.. सविस्तर वाचा
इंदुमती गणेश
कोल्हापूर : १ ताेळा सोन्याचा दर ६३ रुपये.. अहो सांगताय काय? असं कसं शक्य आहे. आजचा दर ऐकला की, डोळ्यासमोर अंधारी आली.. चेष्टा करताय का राव.. अशीच प्रतिक्रिया प्रत्येकाकडून येईल. हो, पण हे खरे आहे. भारतात १९६४ सालचा हा सोन्याचा दर आहे. तोही १० ग्रॅमचा. हा दर १ हजारावर यायला तब्बल १६ वर्षे लागली. तर १९८० ते २०२५ पर्यंत सोन्याच्या दरात १०० टक्के वाढ झाली.
मागील ४०-५० वर्षांतील सोन्याच्या दरावर एक नजर टाकली की, प्रत्येकाच्या मनात अरेरे त्यावेळी आपण का नव्हतो. त्याच वेळी १०-२० तोळे सोने का खरेदी करून ठेवले नाही अशी हळहळच आज प्रत्येकजण व्यक्त करेल. कारण मंगळवारी सोन्याने १ लाख २ हजार रुपयांचा टप्पा गाठला आहे. त्यावेळी पैशालाही मोल होते आणि माणसालाही.. आता सगळीकडेच घसरण झाल्याने तोळाभर सोन्यासाठी लाख रुपये मोजावे लागत आहेत.
वर्षभरात ३० टक्के वाढ
सोन्याचा दर दरवर्षी ८ ते १२ टक्क्यांपर्यंत वाढतो. पाच वर्षांत काेरोना, मंदी या कारणांमुळे सोन्याचे दर झपाट्याने वाढले. मात्र, वर्षभरात तब्बल ३० टक्के दरवाढ झाली.
चीन-अमेरिकेने लादली दरवाढ
अमेरिकेतील ट्रम्प टेरिफ त्याला प्रत्युत्तर म्हणून चीननेही वाढवलेले शुल्क आणि या दोन महासत्तांमधील आर्थिक युद्धाने सोन्याची दरवाढ लादली आहे. जागतिक बाजारपेठेत अस्थिरता आली की सगळे देश सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यावर भर देते. त्यामुळे दरवाढ होते.
साल : दर रुपयांत (प्रति १० ग्रॅम)
१९६४ : ६३
१९६७ : १०२
१९७९ : ९३७
१९८० : १ हजार ३३०
२००७ : १० हजार ८००
२०११ : २६ हजार ४००
२०१८ : ३१ हजार ४३८
२०२१ : ४८ हजार ७२०
२०२३ : ६५ हजार ३३०
२०२४ : ७७ हजार ९१३
एप्रिल २०२५ : १ लाख
कस्टम ड्युटीने वाढले ६ हजार रुपये
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर ९३ हजार रुपये प्रतितोळा आहे; पण भारतात ६ टक्के कस्टम ड्युटी लागल्याने तो १ लाख २ हजारावर गेला आहे.
गुंतवणूक की गरज याचा विचार करून सोने खरेदी करा. लग्नकार्य असेल तर टप्प्याटप्प्याने दागिन्यांची खरेदी करावी. गुंतवणुकीसाठी थोडे थांबले तरी चालेल. - भरत ओसवाल, अध्यक्ष,कोल्हापूर जिल्हा सराफ संघ