Kolhapur: 'निष्ठेला हाच का तो न्याय?'; सुरेश हाळवणकर यांच्या समर्थकांनी पोस्टर झळकावले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 02:24 PM2024-10-18T14:24:29+5:302024-10-18T14:26:39+5:30
नेत्यांचा पक्षप्रवेश पण निष्ठावंत कार्यकर्त्यांचे काय?
दुर्वा दळवी
कोल्हापूर: इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रकाश आवाडे आणि त्यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांचा काहीच दिवसांपूर्वी पक्षप्रवेश भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित पार पडला. आवाडेंचे कट्टर विरोधक आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनाच आवाडे पिता-पुत्रांना हात धरून व्यासपीठांवर पक्ष प्रवेशासाठी आणण्याची सूचना करण्यात आली होती. ज्या विरोधकांमधून एकेकाळी विस्तव ही जात नव्हता त्यांना एकत्र बघून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पण गुरुवारी पुन्हा एकदा हाळवणकर-आवाडे यांच्यातील 'दूरी' अधिक तीव्रतेने दिसून आली.
इचलकरंजी येथे काल, गुरुवारी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हाळवणकर यांच्या कार्यकर्त्यांनी थेट बावनकुळे यांच्यासमोर 'निष्ठेला हाच का न्याय?' असे पोस्टर झळकावले. तर मनोगत व्यक्त करताना हाळवणकर यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. त्यामुळे हाळवणकर गटातील नाराजी आता समोर आली आहे.
आश्चर्यकारक बाब म्हणजे आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून ही ते ह्या मेळाव्याला उपस्थित नव्हते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आवाडे पिता-पुत्राचा भाजपात झालेला पक्षप्रवेश पाहून नेत्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात मात्र चांगलीच घालमेल झाली. पक्षप्रवेश होऊनही दोन नेत्यांमध्ये असणारी नाराजी, कार्यकर्त्यांच्या मनातील खदखद आता बाहेर पडताना पाहायला मिळत आहे. त्यामुळेच बावनकुळे यांच्या उपस्थित पार पडलेल्या मेळाव्यात फक्त हाळवणकर गट दिसून आला.
नेत्यांचा पक्षप्रवेश पण निष्ठावंत कार्यकर्त्यांचे काय?
आवाडे यांची मेळाव्याला अनुपस्थिती आणि हाळवणकर गटाची नाराजी यामुळे इचलकरंजीत कमळ फुलवण्यासाठी हाळवणकर आणि आवाडे यांचे कार्यकर्ते कामाला लागणार का? तसेच नेत्यांसोबत कार्यकर्त्यांचे मनोमिलन कधी होणार अशी चर्चा ही आता जिल्ह्यात रंगलेली आहे.