Kolhapur Politics: हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पुन्हा माने विरुद्ध शेट्टीच
By विश्वास पाटील | Published: March 1, 2024 11:53 AM2024-03-01T11:53:13+5:302024-03-01T11:53:40+5:30
महाविकास आघाडी शेट्टी यांना बाय देण्याच्या स्थितीत
विश्वास पाटील
कोल्हापूर : पक्ष, चिन्ह कोणतेही असले, तरी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील माने विरुद्ध माजी खासदार राजू शेट्टी या गतवेळच्या पैलवानांमध्येच पुन्हा लोकसभेची कुस्ती होण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीकडून लढावे अशी ऑफर असली तरी शेट्टी मात्र ‘एकला चलो रे..’ या भूमिकेवर ठाम आहेत. तीच भूमिका घेऊन मतदारांसमोर जाण्याची त्यांची योजना आहे. त्यामुळे महाविकास आघाडी या मतदारसंघात त्यांना ‘बाय’ देण्याच्या मनस्थितीत आहे. खासदार माने यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी असून त्यांच्याऐवजी ही उमेदवारी राहुल आवाडे यांना मिळावी, असा प्रयत्न आवाडे गटाकडून सुरू असला, तरी तसे काही घडण्याची शक्यता धूसर वाटते.
या मतदारसंघातून शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून खासदार माने यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ यापूर्वी भाजपकडे होता. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यास भाजपला प्रतिनिधित्व मिळत नाही. त्यामुळे उमेदवार शिंदे शिवसेनेचे ठेवून एक जागा कमळ चिन्हावर लढावी, असा आग्रह भाजपकडून सुरू आहे. हा मतदारसंघ यापूर्वी दोनवेळा भाजपने लढवला आहे. त्यावेळी राज्याच्या राजकारणात भाजप फारसा प्रभावी नसतानाही त्यांच्या उमेदवारांनी चांगली मते घेतली आहेत. त्यामुळे खासदार माने यांनी कमळ चिन्हावर लढावे, असा पर्याय येऊ शकतो. स्वत: माने यांनाही त्यातच जास्त रस आहे; परंतु या वाटणीत शिंदे शिवसेनेची एक जागा कमी होते म्हणून ते कितपत तयार होतात यावरच चिन्ह बदलाचा निर्णय होईल.
या मतदारसंघात शेट्टी यांच्या संघटनेचा व भाजपचा एकही आमदार नाही. शिंदे शिवसेनेचा एक आमदार आहे. महाविकास आघाडी व महायुतीकडे प्रत्येकी तीन आमदार आहेत. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक पाटील यांचे नाव चर्चेत आले होते. त्यांनी काही गावांत संपर्क मोहीमही राबविली होती; परंतु ती नंतर थांबवली. त्यामुळे महाविकास आघाडीचा स्वतंत्र उमेदवार रिंगणात असण्याची शक्यता वाटत नाही. शेट्टी यांच्या उमेदवारीस मुख्यत: शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा जास्त आहे. कारण माने यांचा पराभव हे त्यांचे टार्गेट आहे.
शेट्टी स्वतंत्र लढले तरी ते भाजपच्याच विरोधात लढत असल्याने त्यांना विरोध करू नये. त्यांच्या संघटनेच्या ताकदीचा अन्य काही मतदारसंघांतही फायदा होऊ शकतो, असे गणित त्यामागे आहे. राहुल आवाडे यांनीही लढण्याची तयारी केली आहे; परंतु ते आवाडे गट जणू ताराराणी आघाडीचे अस्तित्व ठेवून राजकारण करीत आहे. त्यांनी भाजपमध्ये अजून प्रवेशच केलेला नसल्याने ते कोणत्या तोंडाने पक्षाकडे उमेदवारी मागतात, अशी विचारणा भाजपमधील नेतेच करीत आहेत. इचलकरंजीच्या स्थानिक राजकारणात आवाडे व भाजपचे सुरेश हाळवणकर यांच्यात फारसे सख्य नाही. तीच स्थिती खासदार माने व आवाडे यांच्यातील संबंधाची आहे. आमदार प्रकाश आवाडे यांचा लोक उमेदवार बदला म्हणतात, असे वक्तव्य केल्याचा व्हिडीओ गेल्याच आठवड्यात व्हायरल झाला होता.
मतदार संघ : पुरुष : स्त्री : एकूण मतदार
शाहूवाडी - १५१४०४ : १४१२४४ : २९२६५१
हातकणंगले - १६८२७७ : १६००४० : ३२८३१७
इचलकरंजी - १५२३७० : १४४५४८ : २९६९१८
शिरोळ : १५६७९५ : १५६०९९ : ३१२८९४
इस्लामपूर : १३६८७४ : १३२२३३ : २६९११०
शिराळा : १५१६२४ : १४३८८२ : २९५५१०
एकूण : ९,१७,३४४ : ८७८,०३७ : १७९५३८१
विधानसभानिहाय बलाबल
- राष्ट्रवादी काँग्रेस : ०२
- काँग्रेस : ०१
- शिवसेना शिंदे गट : ०१
- जनसुराज्य व भाजप सहयोगी : ०१
- अपक्ष व भाजप सहयोगी : ०१
गेल्या निवडणुकीतील की फॅक्टर
- ‘एक मराठा, लाख मराठा’ची हवा
- माने यांचे वक्तृत्व व नव्या नेतृत्वाचा प्रभाव
- राजू शेट्टी कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसल्याचे नकारात्मक वातावरण
- इचलकरंजीच्या पाणीप्रश्नी काय केले नसल्याचा प्रचार
- वंचितच्या उमेदवारांनी घेतलेली लाखावर मते
- गेल्या निवडणुकीतील खासदार माने यांचे मताधिक्य : ९६०३९
- विधानसभेच्या इचलकरंजी, शाहूवाडी आणि हातकणंगले मतदारसंघात खासदार माने यांना मताधिक्य
- विधानसभेच्या शिरोळ, इस्लामपूर, शिराळा मतदारसंघात राजू शेट्टी यांना मताधिक्य.
- माने यांना सर्वाधिक मताधिक्य ७४९३० इचलकरंजीने दिले.
- शेट्टी यांना सर्वाधिक मताधिक्य २१०४२ शिराळ्याने दिले.
अशी झाली लाट..
राजू शेट्टी यांचे २०१४ च्या निवडणुकीतील मताधिक्य १७७८१० होते. ते फेडून खासदार माने यांनी नव्याने ९६०३९ मताधिक्य मिळवले एवढी लाट गेल्या निवडणुकीत शेट्टी यांच्याविरोधात उसळली होती.