हातकणंगले: जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसमोरच प्रचंड वादावादी

By भीमगोंड देसाई | Published: September 13, 2022 10:26 PM2022-09-13T22:26:30+5:302022-09-13T22:27:08+5:30

कबनूर ग्रामपंचायत कर्मचारी शिवीगाळ प्रकरण: पदाधिकारी, कर्मचारी आमने-सामने

in hatkanangle huge controversy in front of village panchayat officials in zilla parishad | हातकणंगले: जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसमोरच प्रचंड वादावादी

हातकणंगले: जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसमोरच प्रचंड वादावादी

Next

भीमगोंडा देसाई : लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर: हातकणंगले तालुक्यातील कबनूर ग्रामपंचायत सफाई कामगारास सदस्याने शिवीगाळ केल्याचे प्रकरण मंगळवारी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांच्यासमोर तोडग्यासाठी आले. यावेळी श्रमिक जनरल कामगार संघटनेचे आप्पा पाटील, सुकुमार कांबळे, औदुंबर साठे, नागेश गेजगे आणि सरपंच शोभा पोवार, उपसरपंच सुधीर पाटील, सदस्य भैय्या जाधव यांच्यात दीड तास वादावादी झाली. जाधव यांच्यासमोर जोरदार वादावादी झाली तरी त्यांनी हस्तक्षेप न करता शांतपणे ऐकून घेणे पसंत केले. वाद वाढत जात राहिल्याने शेवटी जाधव खुर्चीवरून उठून निघून गेले.

कबनूर ग्रामपंचायत सदस्य सैफ मुजावर यांनी मस्टर लपवून ठेवल्यासंबंधीची तक्रार संघटनेतर्फे ग्रामपंचायतकडे करण्यात आली होती. त्याचा राग मनात धरून सदस्य मुजावर यांनी सफाई कामगार नागेश कांबळे यांना मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. सर्व कामगारांना उद्देशून बघून घेण्याची धमकी दिली, असा आरोप करीत संघटनेचे अध्यक्ष पाटील यांनी ग्रामपंचायत आणि पोलिसांकडे मुजावर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. हा वाद मिटविण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांनी ग्रामपंचायत आणि कामगार संघटनेचे पदाधिकारी, कर्मचाऱ्यांना कक्षात बोलवून घेतले. सर्वजण दुपारी साडेतीन वाजता कक्षात आले. दोन्हीकडून आरोप, प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरू झाल्या. ग्रामपंचायत, सदस्य मुजावर यांची बाजू उपसरपंच सुधीर पाटील मांडत होते. शिवीगाळ झालेल्या कर्मचाऱ्याची बाजू आप्पा पाटील मांडत होते. या दोघांत अनेकवेळा शाब्दिक खडाजंगी झाली. दोन्हींकडून वादावादी होत राहिली. दीड तास असा प्रकार सुरू राहिला; पण शेवटी काहीही निर्णय झाला नाही.

केवळ बघ्याची भूमिका घेतली

दीड तास वादावादी झाली तर ठोस निर्णय काही न घेता उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. यामुळे आज, बुधवारपासून कबनूर ग्रामपंचायत कर्मचारी काम बंद आंदोलन सुरू करीत आहेत. शिवीगाळ प्रकरणी मुजावर या सदस्यावर कारवाई न झाल्यास प्रसंगी पोलीस ठाण्यावर मोर्चाही काढण्याचा इशारा कामगार संघटनेचे अध्यक्ष आप्पा पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.

Web Title: in hatkanangle huge controversy in front of village panchayat officials in zilla parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.