‘लाचे’त पंटरच खास, ‘साहेबां’ना होत नाही त्रास
By इंदुमती सूर्यवंशी | Published: July 16, 2022 05:41 PM2022-07-16T17:41:57+5:302022-07-16T17:44:28+5:30
तानाजी पोवार कोल्हापूर : सरकारी कामात लाच घेण्यासाठी अलीकडे बहुतांश विभागात खासगी व्यक्ती म्हणजेच पंटरचा वापर वाढल्याचे कारवाईवरून स्पष्ट ...
तानाजी पोवार
कोल्हापूर : सरकारी कामात लाच घेण्यासाठी अलीकडे बहुतांश विभागात खासगी व्यक्ती म्हणजेच पंटरचा वापर वाढल्याचे कारवाईवरून स्पष्ट होते. पंटरद्वारे लाच घेतल्यास साहेबही सुरक्षितता अनुभवतो. गेल्या साडेचार वर्षात जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १२८ ठिकाणी सापळा लावून लाच घेणाऱ्या सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यासह तब्बल १८२ जणांच्या मुसक्या आवळल्या. त्यामध्ये तब्बल ६१ पंटरांचा समावेश आहे.
‘सरकारी काम सहा महिने थांब’ अशी म्हणच समाजात रूढ आहे. काम थांबविण्यासाठी ‘लाच’ हेच रहस्य असते. लाच दिल्यानंतर झटक्यात काम पूर्ण होते हे सरकारी कार्यालयातील चित्र आहे. पण सरकारी अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची असणारी करडी नजर असते. अलीकडच्या वाढत्या कारवाईमुळे अनेक जण सावधगिरी बाळगत पंटरद्वारे लाच घेतात. त्यामुळे साहेबही सुरक्षित अन वरकमाईही रग्गड होते. सरकारी कार्यालयातील या ‘फार्म्युला’मुळे पंटरना मात्र सुगीचे दिवस सुरू आहेत.
गेल्या साडेचार वर्षातील कारवाई
वर्ष : यशस्वी सापळे - एकूण लाचखोर - खासगी व्यक्ती/पंटर
२०१८ : ३४ - ४३ - १२
२०१९ : ३१ - ४१ - १६
२०२० : २७ - ४२ - १२
२०२१ : २४ - ३८ - १४
सहा महिन्यात २१ लाचखोर सापडले
गेल्या सहा महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळे लावून १२ ठिकाणी छापे टाकले, त्यात २१ लाचखोरांना गजाआड डांबण्यात यश आले. त्यामध्ये तीनच पंटरचा समावेश आहे.
लाचखोरीत पोलिसांची बाजी
२०१८ ते २०२१ या चार वर्षात लाचखोरीत महसूल विभागाने आपला नंबर जिल्ह्यात नेहमीच अव्वल राखला. पण २०२२ च्या सहा महिन्यात महसूल विभागाला मागे टाकत पोलीस विभागाने प्रथम क्रमांक गाठला. सहा महिन्यात पाच कारवाईत तब्बल सात पोलिसांना लाच घेताना ‘एसीबी’ने पकडले.
लाचेसाठी सरकारी काम आडविणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्याबाबत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी अगर टोल फ्री नं. १०६४ वर संपर्क साधा. लाचखोराला बेड्या ठोकू, तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवून काम पूर्णत्वात नेण्यासाठी प्रयत्न करु. - आदिनाथ बुधवंत, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर.