पन्हाळ्यात समाजकंटकांनी तोडलेली मजार सर्वधर्मीयांनी पुन्हा बांधली
By उद्धव गोडसे | Published: May 25, 2023 01:44 PM2023-05-25T13:44:59+5:302023-05-25T13:45:32+5:30
पन्हाळ्यातील इतिहासाची साक्ष असलेल्या तानपीर मजारीची तोडफोड करण्याचे कृत्य काही समाज कंटकांनी बुधवारी मध्यरात्रीनंतर केले.
कोल्हापूर : पन्हाळा येथे पुसाटी बुरुजाकडे जाणा-या मार्गावर राजदिंडीजवळ समाजकंटकांनी बुधवारी (दि. २४) रात्री तानपीर मजारची तोडफोड केली होती. सर्वधर्मीयांनी एकत्र येऊन मजारचे पूर्ववत बांधकाम केले. या घटनेनंतर पन्हाळ्यावर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात असून, तहसीलदारांनी पन्हाळ्यावर संचारबंदी लागू केली आहे.
शेकडो वर्षांची समृद्ध ऐतिहासिक परंपरा असलेल्या पन्हाळा गडावर अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. पन्हाळ्यातील इतिहासाची साक्ष असलेल्या तानपीर मजारीची तोडफोड करण्याचे कृत्य काही समाज कंटकांनी बुधवारी मध्यरात्रीनंतर केले. हा प्रकार गुरुवारी पहाटे लक्षात आला. त्यानंतर पन्हाळ्यावरील सर्वधर्मीयांनी एकत्र येऊन मजारचे पूर्ववत बांधकाम करून धार्मिक एकतेचा संदेश दिला. या घटनेनंतर कोणताही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे यांनी पन्हाळा गडावर संचारबंदी लागू केली.
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी घटनास्थळाची पाहणी करून सर्वधर्मीयांना शांतता राखण्याचे आवाहन केले. पन्हाळा गडावर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. सुट्टीच्या काळातच हा प्रकार घडल्याने पर्यटकांना काही काळ त्रास सहन करावा लागला.